संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू याला फाशी दिल्याबद्दल भाजपा-शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरात आंनदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने पद्मा चौकात जिलेबी वाटण्यात आली. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाद्वार चौकात साखर-पेढे वाटले. तर सामान्य जनतेतूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.    
संसदेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांमध्ये अफजल गुरूचा समावेश होता. तो पकडण्यात आलेला एकमेव अतिरेक होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. संसद हल्ला ते फाशीपर्यंतचा प्रवास होण्यास १२ वर्षे गेली. इतक्या वर्षांनंतर अखेर शनिवारी त्याला फासावर लटकविण्यात आले. अफजलला फाशी देण्यात आल्याने देशभरात आनंद साजरा करण्यात आला. कोल्हापूरकरांनीही या निर्णयाचे स्वागत केले. तर भाजपा-शिवसेनेच्या वतीने या निर्णयाबद्दल आनंदोत्सव साजरा केला.     
शिवसेनेचे कार्यकर्ते पद्मा चौकामध्ये एकत्र आले. जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, दत्ता टिपुगडे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, शिवाजी साळोखे, दिलीप पाटील, शुभांगी साळोखे यांच्या नेतृत्वाखाली शंभरावर कार्यकर्त्यांना आनंदोत्सवात भाग घेतला. त्यांनी पादचाऱ्यांना व वाहनधारकांना थांबवून जिलेबी वाटली. ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी संजय पवार म्हणाले, अफजल गुरूला दिलेल्या फाशीचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे. अन्य अतिरेक्यांवर कारवाई होण्यासाठी शासनाने जलदगती न्यायालयात हे खटले चालवावेत, अशी मागणी त्यांनी केली.     
या वेळी ढोल-ताशाच्या निनादात नृत्याचा ठेका धरला होता. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.     शहर भाजपाच्या वतीने फाशीच्या निर्णयाचे स्वागत करताना महाद्वार चौकात साखर-पेढे वाटण्यात आले. या वेळी शहर भाजपाचे अध्यक्ष महेश जाधव यांनी, अफजल गुरूला फाशी देऊन शासनाने योग्य कारवाई केली आहे. मात्र तिचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, हे सारे यश न्याययंत्रणेचे आहे. भाजपाने अफजल गुरूवर कारवाई होण्यासाठी देशव्यापी आंदोलन केले होते. याची दखल शासनाने या निमित्ताने घेतली आहे. देशातील अन्य अतिरेक्यांनाही शासनाने सुळावर चढवावे अशी मागणीही त्यांनी केली.