nsk06वक्तृत्व ही एक कला असून ती आत्मसात करण्यासाठी मेहनत जरूरी आहे. उत्तम वक्ता होण्यासाठी कानसेन असणे महत्वाचे आहे. विषयानुरूप मुद्यांची सुरेख गुंफण होत असतांना भाषेचा लहेजा सांभाळत भाषेचे सौंदर्य खुलविले पाहिजे. त्यासाठी सातत्याने वाचन, विविध वक्त्यांची भाषणे, परिसंवाद, चर्चासत्र हे महत्वाची भूमिका निभावतात, असा कानमंत्र परीक्षकांनी दिला. निमित्त होते ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीचे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ, नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व जनकल्याण सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेची नाशिक विभागीय अंतिम फेरी बुधवारी सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात रंगली. स्पर्धेत यश मिळविणाऱ्यावर एक नजर टाकल्यास विविध विषयांवर मत व्यक्त करताना त्यांनी केलेला अभ्यास, विषयाची मांडणी, विषय सादर करण्याची पध्दत हे सर्वकाही उपस्थितांची दाद मिळवून गेले. प्राथमिक फेरीत ६२ स्र्पधकामधून पात्र ठरलेल्या १२ स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपले वक्तृत्व कौशल्य दाखविले. महाअंतिम फेरीत स्थान मिळविणाऱ्या हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या काजल बोरस्तेने ‘आम्हाला जाहिराती आवडतात कारण..’ हा विषय मांडला. सध्या जाहिरातीने जीवन व्यापले गेले आहे. या माध्यमातून प्रचंड अर्थकारण होत असले तरी मानवी भाव-भावना, क्षणीक सुख, आनंद याचा प्रत्यय देणाऱ्या जाहिराती सध्या जीवनाचा अविभाज्य भाग होत आहेत. या माध्यमातून क्षणीक मनोरंजन होत असले तरी ग्राहक तसेच विक्रेत्यांनी विवेकाने ही कला जोपासली पाहिजे, असे आवाहन केले. उपविजेतेपदाचा मान मिळविणारी बी.वाय.के. महाविद्यालयाची मुग्धा जोशी हिने, ‘ओबामा आले पुढे काय?’ या विषयातून भारत-अमेरिका संबंध, सध्या भारतापुढे असणारे आण्विक ऊर्जा, परराष्ट्र धोरण, संरक्षण, सामरीक, तंत्रज्ञानातील प्रगती या समस्यांचा परामर्श घेत ओबामा यांनी पाकला इशारा दिला असला तरी त्याच्याविरूध्द एक शब्दही काढला नाही, याकडे लक्ष वेधले. अमेरिकेची भूमिका काय याविषयी साशंकता निर्माण होत असल्याचे तिने नमूद केले. ओबामा भेटीनंतर आता चीनला मैत्रीचा हात पुढे करायचा आहे. मोदीच्या राजकारणाचा हा भाग असला तरी भारताचे सार्वभौमत्व जपण्याच्या दृष्टिने काम व्हावे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. तृतीय क्रमांक प्राप्त हं.प्रा.ठा. महाविद्यालयाचा विवेक चित्ते याने ‘संवाद माध्यमे आणि आम्ही’ या विषयावर भूमिका मांडताना सोशल मीडियाची विविध उदाहरणे दिली. माध्यमांनी संवाद गतीमान केल्याने संवादाची गती वाढली. परंतु मनापर्यंत या संवादाला पोहचता आले नसल्याची खंत व्यक्त केली. उलट माध्यमांनी आपल्या भावना संकुचित केल्या. संवादाने शारीरिकदृष्टया जवळ आणले असले तरी भावनिकदृष्टया एकमेकांपासून खूप दूरही करण्यात आले. यामुळे आपली संवेदनशीलता तपासतांना चिंतन गरजेचे आहे. संवादाची माध्यमे हाताळतांना जागरूकता गरजेची असल्याचे त्याने सांगितले. उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आलेल्या सामनगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रवीण खरे आणि के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या श्वेता भामरे यांनी अनुक्रमे जाहिरात आवडते कारण.. तसेच ‘मराठी भाषा अभिजात झाली, मग..’ या विषयावर विचार मांडले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वैशाली शेंडे, पुण्याच्या प्रसिध्द लेखिका निलिमा बोरवणकर आणि उपेंद्र वैद्य यांनी काम पाहिले.
स्पर्धेनंतर परीक्षकांनी मार्गदर्शन केले. बोरवणकर यांनी ‘मशागत’ या विषयावर मत मांडले. काही दशकापूर्वी टीव्हीचे प्रस्थ फारसे नसल्याने अगदी नकळत्या वयापासून वाचन तसेच उत्तम कानसेन होण्याच्या दृष्टिने संस्कार होत असत. आईवडिलांसोबत चर्चासत्र, परिसंवाद, सवाई गंधर्वसारख्या कार्यक्रमांना जाऊन कानांवर संस्कार झाले. लहानपणापासून भाषण देणाऱ्यांना ऐकल्यामुळे वक्तृत्व कला आपसूक विकसीत होत गेली. या जडणघडणीत आईवडिलांसोबतच शाळा आणि पाध्ये बाईंचा मोलाचा वाटा आहे. वक्तृत्व कला जोपासतांना म्हणी, सुविचार यांचा उत्तम संग्रह आपल्याजवळ हवा, जेणेकरून विषयानुरूप त्यांचा संदर्भ घेत बोलणे शक्य हेईल. बोलणे सरधोपट असले तरी त्यात विरामचिन्हे आवश्यक आहेत. तसेच व्यक्तीमत्व विकासात समोरचा काय सांगतो हे ऐकण्याची गरज आहे. आज आपले बोलणे झाले की आपण सरळ बाहेरचा रस्ता धरतो. ते चुकीचे आहे. आपल्या चुका मान्य करणे, तो सुधारण्याचा प्रयत्न करणे हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. दुसऱ्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करणे हे आनंददायी जीवनासाठी आवश्यक आहे. बौध्दिक मशागती सोबत मानसिक, शारीरिक मशागत आवश्यक आहे.
आजच्या तरूणाईने विविध माध्यमांचा वापर करत आपली कला जोपासायला हवी, असे आवाहनही बोरवणकर यानी केले. वैशाली शेंडे यांनी स्पर्धा खरोखर चुरशीची झाल्याचे सांगत स्पर्धकाने तयारी कशी करावी, मुद्यांची मांडणी कशी करावी, याविषयी माहिती देताना स्वलिखीत ‘रेड लाईट’ या कवितेचे वाचन केले.कार्यक्रमास विभागीय उपमहाव्यवस्थापक (वितरण) सुरेश बोडस, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) महेंद्र धारवाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एक्स्प्रेस समुहाचे नाशिकचे मुख्य वितरक देवदत्त जोशी यांनी निवेदन केले.