श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे मालक समीर व पल्लवी जोशी यांना शनिवारी अकोला येथील न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूकडून झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पण त्यांच्याविरुद्ध आणखी एका गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आल्याने त्यांना सोमवारी पुन्हा अटक करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
अकोल्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्याच्या समीर जोशी व पल्लवी जोशी या दांपत्याला आज न्या. तांबी यांच्या समोर हजर केले असता दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भुयार यांच्याकडे चौकशीसाठी असून या दोन्ही आरोपींना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी बाजू सरकारी वकील नागरे यांनी मांडली, तर आरोपींचे वकील देशमुख यांनीही जोरदार युक्तीवाद करून आता पोलीस कोठडीची काहीच गरज नसल्याचे प्रतिपादन करून त्यासाठी त्यांनी अनेक मुद्दे मांडले. न्यायाधीशांनी सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, परंतु आर्थिक गुन्हे शाखेने या आरोपींविरुद्ध दुसऱ्या गुन्ह्य़ाची नोंद केली असून त्या गुन्ह्य़ाअंतर्गत सोमवारी त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. समीर व पल्लवी जोशी या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट घोटाळा प्रकरणात पोलिसांनी ३०२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.