भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी खासदार दत्ता मेघे यांच्या समर्थकांना सामावून घेण्यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आल्याने तट्ट फु गलेली ही कार्यकारिणी विदर्भातील सर्वात मोठी जिल्हा कार्यकारिणी ठरली आहे.
माजी खासदार दत्ता यांनी महिन्याभरापूर्वी भाजपात प्रवेश केला. यावेळी मोठय़ा संख्येने त्यांचे समर्थक पक्षात आले, तसेच खुद्द मेघे यांनी दहा हजार सदस्यांची नोंद नव्याने करणार असल्याची हमी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिली होती. त्याला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस यांनी मेघे समर्थकांना पक्षात विविध पदांवर सामावून घेण्यासाठी विशेष विस्तार करण्याची हमी दिली होती. प्रदेशाध्यक्ष फ डणवीस यांनी नव्या विस्तारित कार्यकारिणीस हिरवी झेंडा दिल्यानंतर खासदार रामदास तडस व जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी आज पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली. जुनी कार्यकारिणी १६७ पदाधिकाऱ्यांची असून त्यात आता ६० मेघे समर्थकांना सामावून घेण्यात आले आहे. याखेरीज भाजपच्या खासदारांसह १०२ लोकप्रतिनिधी कायम निमंत्रित असल्याने संपूर्ण कार्यकारिणीची संख्या तीनशेवर पोहोचली आहे. विदर्भातील ही अशी सर्वात मोठी कार्यकारिणी ठरली असून जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी यापुढे सभागृहच आरक्षित करण्याची आपत्ती जिल्हाध्यक्षांवर राहणार आहे.     
जिल्हा कार्यकारिणीत सामावून घेण्यात आलेल्या मेघे समर्थकांमध्ये प्रामुख्याने डॉ.पंकज भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, अशोक कलोडे, बंटी गोसावी, शंकर थोरात, रवी वैद्य, महेश भाटिया, हरीदास ढोक, पवन साहू, डॉ. ईश्वर इंगोले, मदन चावरे, वरुण पांडे, कैलास राखडे, विलास दौड, निलेश किटे, राहुल अरुण उरकांदे, वरुण पाठक यांचा समावेश असून त्यांना उपाध्यक्ष, चिटणीस व तत्सम पदे देण्यात आली आहेत.
मेघेंसोबत असणाऱ्या काही नेत्यांनी स्वत: कॉंग्रेसमध्येच थांबून आपल्या मुलांना भाजपमध्ये पाठविल्याचे यातून दिसून येते. अल्पसंख्यांक आघाडीत नौशाद शेख व अन्य पाच कार्यकर्ते तसेच महिला आघाडीत सरस्वती मडावी, पुष्पा मोहोड व अन्य महिला समर्थकांना सामावून घेण्यात आले आहे.
याखेरीज अनुसूचित जाती व जमाती आघाडीतही समर्थक आहेत. सागर मेघे, गिरधर राठी, प्रदीप ठाकूर, साधना सराफ , विलास कांबळे व शब्बीर कुरेशी यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्याची शिफोरस करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे यांनी नमूद केले.
पुढील काही दिवसांत काही नेते भाजपात येणार असल्याचे संकेत खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिले. माजी खासदार सुरेश वाघमारे व डॉ. पंकज भोयर, विलास कांबळे, दिलीप ढोके, मिलिंद भेंडे, श्रीधर देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती.