07 March 2021

News Flash

१२ वीला खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांची लुबाडणूक!

बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये शुल्क आकारावे, असा राज्य शिक्षण मंडळाचा नियम असताना मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालये मनमानीपणे अधिक पैसे घेऊन

| February 21, 2015 12:03 pm

बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये शुल्क आकारावे, असा राज्य शिक्षण मंडळाचा नियम असताना मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालये मनमानीपणे अधिक पैसे घेऊन विद्यार्थ्यांची लुबाडणूक करीत आहेत. काही महाविद्यालये दीड हजार तर काही चक्क १० ते १२ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारून विद्यार्थी आणि पालकांना लुबाडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या संदर्भात अमित शाह यांनी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’कडे मुंबईची माहिती मागविली होती. त्यानुसार मार्च, २०१३मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेला मुंबईतून कला (५२५१), वाणिज्य (१५,५६२) आणि विज्ञान (३९०२) या शाखांचे मिळून २४,७१५ विद्यार्थी १७ क्रमांकाचा अर्ज भरून खासगीरीत्या बसले होते. कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षणात खंड पडलेले, अनुत्तीर्ण विद्यार्थी खासगीरीत्या परीक्षा देतात. महाविद्यालयांमार्फत त्यांना हे अर्ज भरता येतात. संबंधित महाविद्यालयाने मंडळाच्या वतीने परीक्षेचे अर्ज भरून घेताना ५०० रुपये शुल्क आकारावे, असा नियम आहे. परंतु, अनेक महाविद्यालये यातूनही आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. एकटय़ा मालाड भागातून तब्बल १२०६ विद्यार्थ्यांनी १७ क्रमांकाचा अर्ज भरला होता. त्यापैकी ‘टी.एस. बाफना कनिष्ठ महाविद्यालया’ने हा अर्ज भरून घेण्याकरिता साधारणपणे २५०० रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दिलेल्या पावत्या ‘लोकसत्ता’कडे असून यात काही विद्यार्थ्यांकडून २५००, काहींकडून २५३० अशी रक्कम घेतल्याचे स्पष्ट होते.
खरेतर नियमानुसार महाविद्यालय केवळ ५० खासगी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊ शकते. परंतु, बाफना महाविद्यालयाने वाणिज्य आणि कला शाखेचे मिळून २२५ विद्यार्थ्यांचे अर्ज मंडळाकडे पाठविले होते. असे असताना मंडळाने संबंधित महाविद्यालयाकडून अर्ज स्वीकारलेच कसे, असा प्रश्न आहे. तसेच या २२५ विद्यार्थ्यांचे मिळून सुमारे ४० ते ४५ हजार रुपये महाविद्यालयाने निश्चितपणे कमाविले आहेत. या संदर्भात महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुनीता मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
‘खरेतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे संबंधित महाविद्यालयाला २० रुपये मिळत असतात. तरीही महाविद्यालये दीड हजार ते १० हजार रुपयांपर्यंत विद्यार्थ्यांकडून शुल्कवसुली करीत आहेत,’ असा आरोप ‘शिक्षक शिक्षकेतर स्थानीय लोकाधिकार समिती’चे सरचिटणीस प्रा. दिलीप देशमुख यांनी केला. समितीने या संदर्भात मंडळाकडेही तोंडी तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंडळ ज्याप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची मुदत जाहीर करते, त्याप्रमाणे त्यांनी अर्जासाठी किती रक्कम भरणे आवश्यक आहे, याची माहितीही जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, महाविद्यालयांऐवजी मंडळानेच विभागवार केंद्रे स्थापून या विद्यार्थ्यांकडून अर्ज घ्यावेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबेल, अशी सूचनाही केली. तर मंडळाने अशा विद्यार्थ्यांकडून तक्रारी मागवाव्यात आणि संबंधित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून घेतलेले जादाचे पैसे परत करण्याचे आदेश द्यावे. तसेच, मंडळाचा नियम धुडकावून विद्यार्थ्यांची लुबाडणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे चिटणीस बिमल दोशी यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 12:03 pm

Web Title: junior colleges cheated private students appearing for hsc exam
टॅग : Hsc Exam
Next Stories
1 बहुतांश कंपन्यांचा जाहिरातबाजीसाठी सोशल मीडियाकडे कल
2 देखभाल-दुरुस्तीसाठी जागाच नाही..
3 नवीन प्रारुप आराखडय़ात जुन्याच योजनांचा पाढा
Just Now!
X