औद्योगिक विद्युत मीटरला नवीन जोडणी देण्यासाठी करावे लागणारे अंदाजपत्रक लवकरात लवकर व व्यवस्थित करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुहास वरुडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना पकडले. दुपारी साडेतीन वाजता लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक बाबाराव मुसळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वडगाव कोल्हाटी येथील औद्योगिक वसाहतीत राहुल आसाराम प्रधान यांच्या ‘अपेक्षा एंटरप्रायझेस’साठी विद्युत जोडणीचे काम शेख तरबेज अहमद सरवर अहमद या कंत्राटदारास मिळाले होते. औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. १ व गट क्रमांक ६७ मधील या कामाचे अंदाजपत्रक तातडीने व्हावे, यासाठी कंत्राटदारांनी कागदपत्रे दाखल केली होती.
अंदाजपत्रक लवकर करून देण्यासाठी सुहास वरुडे यांनी कंत्राटदाराकडे २० हजारांची मागणी केली. मंगळवारी साडेतीन वाजता पंचासमक्ष लाच घेताना वरुडे यास अटक करण्यात आली.