मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या वाशी व ऐरोली येथील टोलनाक्यांवर राडा करणारे मनसे सैनिक नेहमी नवी मुंबईतील असल्याचा पूर्वानुभव असल्याने बुधवारी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनासाठी लागणारी कुमक याच नवी मुंबईतून जाणार असल्याने नवी मुंबईतून मुंबईत मोठय़ा प्रमाणात ये-जा करणाऱ्या नोकरदारांसाठी बुधवार नसून तो घातवार आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान पदरात पाडून घेण्यापेक्षा एक दिवस घरी बसणे नवी मुंबईकरांनी ठरविले आहे.
मुंबईतील श्रीमंत टोलनाक्यांची सुरुवातच मुळात नवी मुंबईतून होत असून वाशी येथील टोलनाका म्हणजे टांकसाळ आहे. दिवसागणिक या टोलनाक्यावर कोटय़वधी रुपये जमा होत असल्याने ते ठेवायचे कुठे असा प्रश्न टोल संचालकांना पडलेला आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांचे हा टोलनाका पहिले लक्ष्य असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईतील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या आंदोलनाचा नव्याने नारळ वाढवला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जोष चढल्याने त्याच रात्री सर्वप्रथम वाशी येथील टोलनाका फोडण्यात आला. त्यात चार मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. याच आंदोलनाची पुनरावृत्ती बुधवारी होण्याची शक्यता पोलिसांना वाटत असून त्यांनी या कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचे ठरविले आहे. मनसेचे अनेक कार्यकर्ते या धरपकडीच्या भीतीमुळे भूमिगत झाले असून पोलिसांनी ४० प्रमुख कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. हे कार्यकर्ते बुधवारी रस्ता रोको आंदोलनासाठी खुश्कीच्या मार्गाने टोलनाक्याजवळ अवतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस रात्रीपासून नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करणार असल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले. ऐरोली येथील टोलनाका हा मुंबई पोलिसांच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असला तरी या टोलनाक्यावरील आतापर्यंतची सर्व आंदोलने ही ऐरोलीतील कार्यकर्त्यांनी केलेली असल्याचे दिसून येते. ऐरोली येथील कार्यकर्त्यांना दुसरा टोलनाका नसल्याने आंदोलनासाठी हे एक चांगले ठिकाण मानले जात आहे. त्यामुळे टोलनाका मुंबईत आणि आंदोलनकर्ते नवी मुंबईत असे चित्र या ठिकाणचे राहणार आहे. ऐरोली येथील अनेक कार्यकर्ते सकाळी टोलनाक्याजवळ रस्ता रोको करण्यासाठी तैनात होणार आहेत. या दोन्ही टोलनाक्यांना पोलिसांनी बंदोबस्त दिला असून हे टोलनाके ओलांडून दररोज हजारो नोकरदार, उद्योजक, व्यापारी मुंबईत ये-जा करीत असतात. मनसेच्या आंदोलनामुळे या नोकरदार व्यापाऱ्यांनी एक दिवसाची सुट्टी घेणे पसंत करतील अशी शक्याता आहे.  ऐरोली येथील टोलनाक्यावरुन दररोज ये-जा करणारे आमदार मंगेश सांगळे ऐरोली येथे राहात असल्याने विक्रोळी मतदारसंघातील कार्यकर्ते या टोलनाक्याला लक्ष्य करण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्यामुळे बुधवारच्या रात्रीपासून पोलिसांचा मुक्काम या दोन्ही टोलनाक्यांवर वाढला आहे.