News Flash

सासनकाठय़ा नाचवत जोतिबाची यात्रा उत्साहात

गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत न्हाऊन जात, चांगभलंचा अखंड गजर करीत, आकाशवेधी सासनकाठय़ा नाचवत गुरुवारी दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा मंगलमय वातावरणात पार पडली.

| April 26, 2013 01:20 am

गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत न्हाऊन जात, चांगभलंचा अखंड गजर करीत, आकाशवेधी सासनकाठय़ा नाचवत गुरुवारी दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा मंगलमय वातावरणात पार पडली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून आलेले लाखो भाविक देहभान विसरून यात्रेत सहभागी झाले होते. ढोल-ताशा व हलगीच्या निनादात भर दुपारी निघालेल्या पालखी मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. दुष्काळाच्या सावटामुळे यंदा उपस्थितीवर परिणाम जाणवला. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दुष्काळाचा संदर्भ देऊन यंदा जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ दे, अशी प्रार्थना जोतिबाच्या चरणी केली.   
वाडी रत्नागिरी येथे चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा भरते. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने जोतिबाचा अवघा डोंगर लाखो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ असा जयघोष करीत आणि गुलालाची मनसोक्त उधळण करीत भाविक यात्रेमध्ये हरवले होते. यात्रेनिमित्त दिवसभर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता पन्हाळय़ाचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते शासकीय पूजा व महाअभिषेक करण्यात आला. धूपारती सोहळा सकाळी दहा वाजता झाला. दुपारी सहकार तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदींनी जोतिबाचे दर्शन घेतले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी राजाराम माने, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग आदी उपस्थित होते.    
‘राज्यावर सध्या आलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी यंदा मुबलक पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी कर’ अशी प्रार्थना पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठय़ांचे पूजन करण्यात आले. निजाम पाडळी-सातारा, विहे-पाटण, कसबे डिग्रज-सांगली, हिंमतबहाद्दूर चव्हाण-कसबा सांगाव, किवळ-कराड या मानाच्या सासनकाठय़ांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील भाविकांची गर्दी प्रतिवर्षी वाढत चालल्याने या यात्रेकरूंसाठी चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.    
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मानाची तोफ उडवण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळय़ाला सुरुवात झाली. राजेशाही थाटात निघालेल्या सोहळय़ामध्ये शस्त्र, अस्त्र, भालदार, चोपदार, वाजंत्री, पुजारी, तोफेची सलामी, उंट, अश्व, धार्मिक विधी असा लवाजमा होता. पालखीचा लाभ मिळवण्यासाठी गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत भाविक चांगभलंचा गजर करीत पालखीच्या दिशने धावत होते.    
यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली असली तरी त्यांची सर्वप्रकारची सोय करण्यात आली होती. सहजसेवा ट्रस्ट व अन्य मंडळांच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. वाहतुकीचे नियोजनही शिस्तबद्ध करण्यात आले होते. यमाई मंदिराच्या बाजूने नवा पर्यायी मार्ग करण्यात आला आहे. तेथे वाहनतळाची सोय केल्याने प्रचंड गर्दी असूनही वाहनांची दाटीवाटी झाल्याचे चित्र दिसले नाही. राज्य परिवहन महामंडळाने जोतिबाला जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विशेष गाडय़ांची सोय केलेली होती.     
यात्राकाळात घातपात होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष झालेली होती. पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, एक हजार कर्मचारी, पाचशे महिला कर्मचारी, राखीव पोलीस दलाची तुकडी, वाहतूक पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यांच्या मदतीला दोन रुग्णवाहिका, क्रेन यांचीही सोय केली होती.
 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 1:20 am

Web Title: jyotiba pilgrimage celebrated enthusiastically
टॅग : Celebrated
Next Stories
1 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आ. प्रणिती शिंदे काँग्रेसच्या निरीक्षक
2 महालक्ष्मीचा आज कोल्हापुरात रथोत्सव
3 महावीर जयंतीनिमित्त कराडात विविध कार्यक्रम
Just Now!
X