महाराष्ट्राने कबड्डी क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. कबड्डी क्षेत्राच्या भरभराटीसाठी या खेळाला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथे केले.
येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचा समारोप सोमवारी (दि. २१) आमदार आव्हाड यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, जि.प.च्या अध्यक्ष मीना बुधवंत आदी उपस्थित होते.
आमदार आव्हाड म्हणाले, राज्य कबड्डी संघटनेच्या माध्यमातून अजित पवार यांचे कबड्डी क्षेत्रासाठी मोठे योगदान आहे. कबड्डीला यापुढे राजाश्रय मिळाला तर चांगले खेळाडू घडतील आणि कबड्डी क्षेत्रातील महाराष्ट्राची अव्वल परंपरा कायम राखतील. कबड्डी या खेळाचा राजकारणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रतिस्पध्र्यावर मात कशी करायची आणि त्याला पेचात कसे पकडायचे हे कबड्डीतूनच शिकता येते, असेही आव्हाड या वेळी म्हणाले.
जाणता राजाला विजेतेपद
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचा अंतिम सामना परभणी येथील जाणता राजा क्रीडा मंडळ व गेवराईच्या शारदा प्रतिष्ठान या दोन संघांत अत्यंत चुरशीचा झाला. यात जाणता राजा मंडळाने शारदा प्रतिष्ठानवर ३६ विरुद्ध ३२ अशा चार गुणांनी मात करून विजेतेपद पटकावले. स्पध्रेचे तृतीय पारितोषिक खेडुळा संघाला तर एम.एस.एम. औरंगाबादला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सवरेकृष्ट खेळाडू म्हणून रामप्रसाद रणेर (परभणी), उत्कृष्ट चढाई संगीत राठोड (पाथरी), उत्कृष्ट पकड मयूर मोटे (गेवराई) यांना पारितोषिके मिळाली.