महाराष्ट्रातील मातीचा रांगडा खेळ म्हणून ओळखला जाणारा कबड्डीचा खेळ आंतरराष्ट्रीय खेळाप्रमाणे बदलत चालला आहे. या खेळाला अधिकच तेजोमय करण्यासाठी पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अ‍ॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व राजगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी पुढाकार घेतला आहे. स्व. राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धा नुकतीच सुरू झाली असून कोकणची स्वागत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहरात कबड्डी महोत्सव चार दिवस रंगणार आहे. क्रिकेटप्रमाणे कबड्डीलाही ग्लॅमर लाभेल, असा विश्वास प्रशिक्षक आणि खेळाडू व्यक्त करीत आहेत.
कबड्डी खेळाला यामुळे पुन्हा एकदा नवा रंग चढला आहे. राजीव गांधी सुवर्णचषक स्पर्धेत महाराष्ट्रातील जिल्हा आणि राज्य स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबरोबरच देशपातळीवरील खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना देशपातळीवरील स्पर्धेचा एक अनुभव मिळणार आहे.
महिला व पुरुषांच्या अशा १६ नामांकित संघांचा यात समोवश आहे. क्रिकेटच्या धर्तीवर कबड्डी खेळातदेखील स्पर्धकांना रोख व भव्य चषक, बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास दोन लाख रुपये व भव्य चषक देण्यात येणार असून उपविजेत्या संघास एक लाख ५० हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
तृतीय आणि चतुर्थ क्रमांकांना ७५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार असून मालिकावीर खेळाडूस २५ हजार रुपये, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूस १५ हजार रुपये तसेच चार दिवस चालणाऱ्या या सामन्यातील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे कबड्डीच्या खेळात खेळांडूना धैर्य मिळणार आहे.
या ठिकाणी राष्ट्रीय स्तराप्रमाणेच शिस्तबद्ध पद्धतीने खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगले प्रशिक्षक, कबड्डीपटूंसाठी चांगलं मैदान, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे सीकेटचे प्रांगण गजबजलेले आहे.
चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा समारोपदेखील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठय़ा दिमाखात होणार आहे.

प्रतिक्रिया
कबड्डीला सुगीचे दिवस आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्रो कबड्डीलादेखील वाव मिळत असून भारतातील एकाच वेळी मॅटवर सहा क्रीडांगणांमध्ये खेळण्यात येणारी ही पहिलीच स्पर्धा असून प्रो कबड्डीमध्ये निवड झालेले सर्वच खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत.
– शरद कदम, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक

रायगड जिल्ह्य़ामध्ये बऱ्याच वर्षांपासून कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून एक दिवस क्रिकेटच्या पुढेही कबड्डीचा खेळ जाईल. त्यासाठी सर्वानी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
– दिलीप कोंडकर, पंच

कबड्डीला भविष्यात उज्ज्वल यश असून कबड्डीच्या भरवण्यात येणाऱ्या सामन्यांमुळे यंग खेळाडूंना यामुळे प्रोत्साहन मिळत असून ते ग्लॅमरमध्ये येत आहेत.
– कुलदीप हिल्लर,   उत्तर प्रदेश पोलीस संघातील खेळाडू

जसं पुरुष खेळाडूंसाठी आयपीएल आहे, तसंच महिला खेळांडूसाठीदेखील सुरू करण्यात येऊन महिला खेळांडूनादेखील दुसऱ्या खेळामध्ये पुढे आणावे.
    – संगीता ऐनपुरे,
    सुवर्णयुग पुणे संघाची महिला खेळाडू

कबड्डीमध्ये पैसा आला असून कबड्डीचा चांगला प्रसार होत आहे. कबड्डीच्या खेळामुळे माणूस शारीरिकदृष्टय़ा सक्षम होत असून प्रो कबड्डीला चांगला प्रतिसाद मिळाला तर कबड्डी कडे खेळाडू आकर्षित होतील. खेळाडू अजून जोमाने मेहनत घेतील.
    – अमित साटम,
    महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा संघाचा खेळाडू