स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या डीवॉट्स संस्थेने कैकाडीनगर ते महाजन नगरापर्यंतचा कायापालट घडवून आणला तो सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. शौचालय, स्नानघर, स्वयंपाक घर, धोबी घाटावर दूषित पाणी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते. सार्वजनिक आरोग्याबरोबरच लोकांचा सामाजिक स्तर वाढवण्यावर डीवॉट्स मुख्यत्वे प्रयत्न करत आहे. महाजन नगरातील नागरिकांच्या बाबतीतही नेमके तेच घडले.
महाजन नगरच्या इतिहासही बराच रोचक आहे. अजनी चौक परिसरातील कैकाडी वस्तीत बीड जिल्ह्य़ातून आलेला मूळचा कैकाडी समाज पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत होता. स्त्रिया काचेच्या बरण्या विकण्याचे काम करायच्या. मात्र, ती जागा एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतल्याने तेथील नागरिकांचे पुनर्वसन दहा वर्षांपूर्वी मनीषनगर या ओसाड ठिकाणी करण्यात आले. संपूर्ण वस्ती एका नाल्याच्या काठच्या जमिनीवर येऊन राहती झाली. पत्रे व गोणपाट, तट्टय़ांचा वापर करून बांधलेले लहानसे आडोसे (ज्याला घर म्हणणे अवघड) म्हणजे त्यांचे घर. अशा १६५ झोपडपट्टय़ा तेथे होत्या. त्यात ६०० ते ७०० माणसे राहत होती. शौचाची सुविधा नाही, पाण्याची सोय नाही, वीज नाही आणि बाजूला सांडपाण्याचा नाला. सगळीकडे माशा, मच्छर, चिलटे आणि डुकरांचे साम्राज्य. अशा वस्तीत डिसेंट्रलाईज्ड वेस्टवॉटर ट्रिटमेंट सिस्टिम(डीवाट्स) बांधण्याचे निश्चित झाले. त्यासाठी लागणारा खर्च जर्मनीच्या ब्रिमैन ओवरसिज रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन (बोरडा) या संस्थेने उचलला. अनेक समज-गैरसमज, अडचणी पार करून प्रत्यक्षात डीवाट्स हा प्रकल्प सुरू व्हायला २००३ साल उजाडले. लोकांना वेगवेगळ्या युक्तयांनी, शिबिरांसारख्या उपक्रमांनी हा प्रकल्प त्यांच्या फायद्याचा असल्याचे पटवून देऊन त्यांचे मन वळवून, त्यांना राजी करण्याचे काम राजश्री आवंढे आणि स्वाती पोलके या दोन बहिणींनी
केले.
महाजननगरात खरे तर सार्वजनिक शौचालयांचा प्रस्ताव होता. मात्र लोकांनी व्यक्तिगत शौचालये बांधण्यावरच जोर दिला. त्यासाठी काहींनी पैसे उभारले. तर काही कुटुंबांना बचत गटांनी कर्ज देऊन मदत केली. कैकाडीनगराचा आज महाजन नगराच्या रूपात झालेला कायापालट केवळ शौचालयांच्या रूपातच झाला असे नव्हे तर त्यानंतर त्या भागात रस्ते आले, वीज आली, महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्वासित म्हणून आलेल्या कैकाडी व हिंदी भाषक समाजाची महाजननगरात स्वत:ची हक्काची घरे
 झाली.
यासंदर्भात संचित भांडारकर म्हणतात, नागपुरातील ४०० झोपडपट्टय़ांपैकी सुमारे २४० झोपडपट्टय़ा नियमित करण्यात आल्या आहेत तर उर्वरित अनियमित असून त्यांना नियमित करण्याचे लढे सुरूच आहेत. आम्ही डीवाट्स उभारण्याचे ठरवल्यावर ‘मोफत कोणतीच गोष्ट तुम्हाला देणार नाही. तुमचा सहभाग त्यात हवा. असे तेथील नागरिकांना बजावले होते’. नागरिकांनी हळूहळू प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आज सर्वच मूलभूत सोयी त्यांना मिळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे वस्तीतील प्रत्येक घराची रजिस्ट्री झाली
आहे.