पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतामध्ये तक्षशिला, नालंदासारखी शेकडो वर्षांचा इतिहास असलेली जुनी व दर्जेदार विद्यापीठे होऊन गेली. त्यांचे जतन करण्याचे पुरेसे प्रयत्न येथे होऊ शकले नाहीत. न्यूटनचा कालखंड अस्तित्वात येण्यापूर्वी ५०० वर्षे आगोदर भास्कराचार्यानी गणितातील मोठय़ा संकल्पना शोधून काढल्या. तरीही न्यूटन लोकांना आठवतो आणि भास्कराचार्याबद्दल आपणाला पुरेशी माहिती नसते, अशी खंत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केली. भास्कराचार्याच्या कार्याची आणि त्यांच्या संशोधनाची माहिती भारतीय तरुणांना होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
गणितातील अतिकिचकट संकल्पनांवर संशोधन करून ते जगापुढे मांडणाऱ्या भास्कराचार्याचे आधुनिक विज्ञानामधील योगदान महत्त्वाचे मानावे लागेल. भास्कराचार्याच्या गणित संकल्पना धातुशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकल्या आहेत. त्यांच्या संशोधनामुळे जगाच्या प्रगतीमध्ये मोठी भर पडू शकली हे आधुनिक विज्ञानातील त्यांच्या योगदानावरून अधोरेखित होते, असेही ते म्हणाले. भास्कराचार्याच्या ९००व्या जयंतीनिमित्ताने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने ‘भास्कर ९००’ या तीन दिवसीय आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहामध्ये डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी डॉ.काकोडकर यांनी संवाद साधला. भास्कराचार्याच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय पातळीवरील मोठमोठय़ा संस्थांकडून भरीव कार्यक्रमांची अपेक्षा होती. त्यामुळेच अशा संस्था पुढील वर्षभरात भास्कराचार्याविषयी कोणते कार्यक्रम करत आहेत, याची चाचपणी केली असता राष्ट्रीय स्थरावरील मोठय़ा संस्थांमध्ये त्यांच्या योगदानाविषयी अज्ञान असल्याचे काकोडकर म्हणाले.