येथील डॉ. दशावतार बडे व ज्योती बडे यांनी आयोजन केलेल्या ‘कला स्पंदन’ या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. घोरपडे नाटय़गृह येथे दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात फोटोग्राफी, पेंटिंग्ज व हस्तकलेवर आधारित अनेक कलाकृती पाहावयास मिळाल्या. प्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी पी. एल. हणबर, डॉ. अरुण पाटील, डॉ. अरुण कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते. प्रदर्शनामधील छायाचित्रांमध्ये व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे आदींचा प्रामुख्याने समावेश होता. १७ देशातील विविध विषयांवरील आकर्षक छायाचित्रेही या निमित्ताने पाहावयास मिळाली. मॅक्रो फोटोग्राफी अंतर्गत काढलेली छायाचित्रे हे आकर्षण व वैशिष्ठय़ राहिले. डॉ. ज्योती बडे यांनी तयार केलेल्या भारतीय चित्र शैलीतून चित्र कलाकृती आकर्षित करीत होत्या. भारतीय चित्र शैलीतील मिनीएचर्स, सिरॅमिक पॉट्स, मूर्तीवरील पेंटिंग्ज व डेटिंग, राज्यस्थानी चित्रकला मातीच्या भांडय़ांवर रेखाटलेली चित्रे, हस्तकला आदी विषयांवरील चित्रेही पाहावयास मिळाली. माधुरी काजवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैलेश सातपुते यांनी आभार मानले.