कल्याण शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव पुढील पिढीनेही जतन करावे या उद्देशाने संवेदना ट्रस्टतर्फे राबविण्यात येणारा ‘काळा तलाव महोत्सव’ १२ ते १४ जानेवारी या कालावधीत काळा तलाव येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य शोभा यात्रा शहरात काढण्यात येणार आहे. यात्रेचा समारोप काळ तलाव येथे होईल. त्यानंतर, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन व त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
 या वेळी मातंग समाजातील १०१ दाम्पत्य जलपूजन करतील. १३ जानेवारीला प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या गाण्यांचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. १४ जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजकांतर्फे उपस्थितांना पतंग, मांजा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक गुजराती बांधव या महोत्सवात सहभागी होतील. संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम सुरू होईल, असे संयोजक दीपक ब्रीद यांनी सांगितले.