राजकारणात कुणीच कुणाचा सदासर्वकाळ मित्र किंवा शत्रू नसतो, याची प्रचीती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उल्हासनगरमध्ये येत असून एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पप्पू कलानी आणि जीवन इदनानी सिंधी मतांच्या ध्रुवीकरणासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे आधीच सेनेबरोबरची युती तुटल्याने एकाकी पडलेले भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी कट्टर आव्हान उभे केले आहे.
उल्हासनगरच्या राजकारणात बहुसंख्येने असणाऱ्या सिंधी समाजाचा अजूनही वरचष्मा आहे. शहरात ३५ टक्के सिंधी समाज आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी पप्पू कलानी म्हणेल तोच पक्ष येथील सत्ताकारणात प्रभावी ठरत होता. मात्र टाडा लागल्यानंतर पप्पूच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि गोपाळ राजवानींच्या मदतीने शिवसेनेने उल्हासनगर महापालिकेत सत्ता हस्तगत गेली. दरम्यानच्या काळात एकेकाळी कलानी गोटातील उजवे हात मानले जाणारे जीवन इदनानी यांनीही मतभेद झाल्याने त्यांची साथ सोडून साई बलराम यांच्या साई पक्षात प्रवेश केला. महापालिकेत नऊ नगरसेवक असणाऱ्या या पक्षाच्या आशा इदनानी यांनी शहराचे महापौरपदही भूषविले. मध्यंतरी शहरातील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या प्रश्नावरून महापालिकेतील सत्ताधारी आणि कलानी परिवारात बराच संघर्ष झाला. यासंदर्भात झालेल्या एका सभेत पप्पू कलानी याने जीवन इदनानी यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. त्यातूनच लोकसभा निवडणुकीत साई पक्षाने शिवसेनेला साथ दिली होती. मात्र त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत साई पक्षाने घूमजाव करीत पप्पू कलानींना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहर हिताचा निर्णय
यासंदर्भात जीवन इदनानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा शहर हिताच्या दृष्टीने साई पक्ष राष्ट्रवादीला साथ देणार असल्याचे सांगितले.