महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरूण रंगकर्मींमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० पासून शिवाजी मंदिर येथे होणार आहे. अंतिम फेरीत सादर होणाऱ्या नाटकांमध्ये ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेतील ललित प्रभाकर, ‘डोबिवली फास्ट’प्रसिद्ध संदेश जाधव, ‘बॉम्बे टॉकीज’प्रसिद्ध भाग्यश्री पाणे आदी काही लोकप्रिय चेहऱ्यांचा समावेश असणार आहेा.
‘अस्तित्व’ आयोजित दिवंगत मु. ब. यंदे पुरस्कृत २८ व्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेत यंदा विजेतेपदासाठी पुणे, मुंबई, कल्याण आणि नागपूर विभागातील एकांकिकांमध्ये चुरस आहे. प्रसिद्ध लेखक-कादंबरीकार राजन खान यांनी सुचविलेल्या ‘माणसं’ या कल्पनेवर आधारित पाच एकांकिका या अंतिम स्पर्धेत सादर होणार आहेत.
अरुण कोलटकर यांच्या कवितांवर आधारित असलेली व ललित प्रभाकर दिग्दर्शित मितीचार-कल्याणची ‘सर्पसत्र’, रंगभूमी-नागपूरची गौरव खोंड लिखित आणि दिग्दर्शित ‘तिमीरात’, संक्रमण-पुणेची यतीन माझरे लिखित ‘उडान’, सकस-मुंबईची विशाल कदम लिखित व सुमीत पवार दिग्दर्शित ‘खेळ मांडियेला’ आणि प्रवेश-मुंबईची भाग्यश्री पाणी लिखित व संदेश जाधव दिग्दर्शित ‘ब्लॅकआऊट’ या पाच वेगळ्या धाटणीच्या एकांकिकांमधून विजेत्या एकांकिकेची निवड केली जाणार आहे. १५ वर्षे नाटय़दर्पण व नंतरची दोन वर्षे नेहरू सेंटर आयोजित ही स्पर्धा १९९९ मध्ये बंद पडली. २००४ मध्ये रवी मिश्रा यांनी ती पुन्हा सुरू केली. आजवर या स्पर्धेत साडेतीनहजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत.