सर्वप्रथम ‘नाटय़दर्पण’, व त्यानंतर नेहरू सेंटर’ या संस्थांनी अनुक्रमे १५ आणि २ वर्षे आयोजिलेल्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन रवी मिश्रा यांच्या ‘अस्तित्व’ या संस्थेकडे आल्यानंतर स्पर्धेचे यंदा १०वे वर्ष आहे. आजही या स्पर्धेला  मानाचे स्थान आहे.
लेखकांना महत्त्व देणारी, नवे लेखक व विषयांना चालना देणारी, नव्या लेखकांना आपली क्षमता तपासण्याची संधी मिळणारी ही स्पर्धा आगळी म्हणावी लागेल. या स्पर्धेसाठी लेखकांना एक विषय दिला जातो व त्या  विषयावर लेखक आपली गुणवत्ता सिद्ध करत असतात. ‘नाटय़दर्पण’च्या काळात या स्पर्धेतून पुढे आलेले अनेक लेखक आज प्रथितयश म्हणून मान्यता पावलेले आहेत. या एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून केवळ लेखक नव्हे तर दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची एक नवी पिढी तयार झाली. यात माधवी जुवेकर, हेमांगी कवी-धुमाळ, कुणाल लिमये, विजू माने, अभिजित चव्हाण, प्रसाद बर्वे, समीर सुर्वे, आशिष पाथरे, अजय परचुरे, ऋषिकेश कोली आदी अनेकांचा  समावेश आहे. गेल्या १० वर्षांत या स्पर्धेत साडेतीन हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत.   यंदाच्या दहाव्या वर्षांसाठी  नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी ‘हे किरकोळ, ते महत्वाचे’ असा विषय सुचविला आहे. या एकाच विषयावर विविध एकांकिका स्पर्धेत सादर होणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी येत्या १९ ऑक्टोबर रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.