दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत वीज पोहोचण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या महावितरण कंपनीने सह्य़ाद्रीच्या रांगेतील सर्वोच्च कळसूबाई शिखर प्रकाशमान केले आहे. शिखरावरील विद्युत प्रकल्पाचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे हे शिखर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.
इगतपुरी तालुक्याच्या सीमारेषेवर असलेले कळसूबाई शिखर अकोले तालुक्यातील महावितरणच्या राजूर उपविभागांतर्गत येते. कळसूबाई शिखर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध उपक्रमांचा आराखडा तयार आहे. मात्र या उपक्रमांच्या पायाभरणीसाठी शिखरावर विद्युतीकरण आवश्यक होते. या आव्हानाची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर म्हणजेच ५४०० फूट उंचावर विद्युत प्रकल्पाची उभारणी करणे हे कंपनीसमोर आव्हान होते. यासाठी विद्युत वितरण विभागाला ऑगस्ट २०१४ ची मुदत देण्यात आली. या वेळी महावितरणाचे मुख्य अभियंता अजनाळकर, अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी आदींच्या मार्गदर्शनाखाली शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावापासून शिखरापर्यंत ११ केव्ही दाबाची सुमारे ३ किलो मीटर लांबीची भूमिगत वाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली. तसेच शिखरावर ६३ के.व्ही. क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे व लघुदाब वाहिनी उभारण्याचे अवघड काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. विद्युत प्रकल्प उभारल्याने कळसूबाईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून यामुळे गावकऱ्यांसह पर्यटकांची मोठी सोय झाली आहे. शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.