शहरासह तालुक्यात रॉकेलच्या कोटय़ात दिवसेंदिवस होणाऱ्या कपातीमुळे गरजूंची गैरसोय होत असून रॉकेलच्या कोटय़ात वाढ करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कळवणसाठी दोन वर्षांपूर्वी सुमारे १३ टँकर एवढा रॉकेलचा पुरवठा होत असे. मागील वर्षी ही संख्या १० टँकपर्यंत तर यंदा  सात टँकर एवढी मर्यादित झाली. कमी रॉकेल मिळत असल्याने विक्रेत्यांकडूनही ग्राहकांना कमी प्रमाणात रॉकेलचे वाटप होत आहे. त्यामुळे वारंवार ग्राहकांशी होणाऱ्या शाब्दिक चकमकींना वैतागून शहरातील ८९ किरकोळ परवानाधारक विक्रेत्यांनी राजीनामा दिला आहे. सध्याच्या रॉकेल कोटय़ात पुन्हा कपात केली जाणार असल्याचे सांगितले जाते. सध्या प्रति रेशनकार्डधारकास दोन लिटर रॉकेल मिळते. दोन गॅस सिलिंडरधारकास रॉकेल मिळत नाही. एक सिलिंडर असलेल्यांना एक लिटर तर सिलिंडर नसलेल्यांना पूर्वी पाच लिटर रॉकेल मिळायचे. सध्या फक्त दोन लिटर रॉकेल मिळते. तालुक्यात सिलिंडर नसलेल्यांमध्ये मजुरांचे प्रमाण अधिक आहे. मजुरांना केवळ दोन लिटर रॉकेलमध्ये महिना काढणे कठीण जात आहे. कळवण शहराची लोकसंख्या २० ते २५ हजार असून ७५ टक्के गॅसधारक शहरात तर २५ टक्के गॅसधारक ग्रामीण भागात आहेत. आदिवासी तालुक्यातील जनतेच्या रॉकेलच्या गरजा लक्षात घेऊन किमान प्रतिकार्ड पाच लिटर रॉकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.