शहरातील कचरा कसा उचलायचा, त्याची कशी विल्हेवाट लावायची, याचे कोणतेही ठोस नियोजन कल्याण डोंबिवली महापालिकेकडे नाही, अशी टीका करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. आधारवाडी कचरा क्षेपण केंद्राची कचरा साठवण्याची मुदत दहा वर्षांपूर्वीच संपली आहे. या सर्व व्यवस्थेचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून केले जात नाही. न्यायालयात तोंडघशी पडू नये यासाठी प्रशासन घनकचऱ्याच्या निविदा प्रक्रिया करते, अशी टीका यावेळी विरोधी पक्षांनी केली.
कल्याण डोंबिवली शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधारवाडी कचरा क्षेपण केंद्राच्या परिसरात कचरा गाडय़ा जाण्यास रस्ता नाही. त्यामुळे क्षेपण केंद्राच्या प्रवेशद्वारावर कचरा ओतला जातो. त्यामुळे या परिसरात दरुगधी पसरली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे, शरद गंभीरराव यांनी व्यक्त केली. दहा वर्षांपूर्वीच आधारवाडी केंद्राची कचरा साठवण क्षमता संपली आहे. अलीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कचरा केंद्राबाबत अहवाल देण्याचे पालिका प्रशासनाला सूचित केले आहे. महिनाभरात हा अहवाल दिला नाही तर महासभा, स्थायी समितीला जबाबदार धरण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे अरविंद पोटे यांनी निदर्शनास आणले. टिटवाळा ते कोपरदरम्यान कचरा टाकण्यासाठी सात कचरा केंद्र विकसित करावी. उंबर्डे येथील कचरा केंद्र पूर्ण क्षमतेने चालू करण्याची मागणी नगरसेविका वैशाली दरेकर, उमेश बोरगावकर यांनी केली. घनकचरा विभाग कचरा आणि वाहन विभागात विभागला आहे. हे दोन्ही विभाग एक करण्याची मागणी मंदार हळबे यांनी केली. घनकचऱ्याची एक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासनाने घाईने निविदा प्रक्रिया सुरू केली. प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागवून घेतली, असा आरोप विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी यावेळी केला.