कल्याण-डोंबिवली महापालिकेला शासनाने ‘क’ वर्ग महापालिकेचा दर्जा दिल्याने या महापालिकेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळल्यानंतर ‘क’ वर्ग असलेली महापालिका शासनाने ‘ड’ वर्गात वर्ग केली होती. त्यामुळे महापालिकेत थेट आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात तांत्रिक अडचण उभी राहिली होती.
शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव ज. ना. पाटील यांनी नुकताच एक अध्यादेश काढून कल्याण-डोंबिवली महापालिका ड वर्गातून क वर्गात वर्ग करण्यात येत असल्याचे जाहीर केले. महापालिका हद्दीतील लोकसंख्या, महसुली स्रोत, दरडोई उत्पन्न विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या सुमारे १३ लाख आहे. दरडोई उत्पन्न तीन हजारांहून अधिक आहे. हे निकष ‘क’ वर्ग करताना विचारात घेण्यात आले आहेत. ‘ड’ वर्ग महापालिकेमुळे भारतीय प्रशासन सेवेतील आयुक्त कल्याण-डोंबिवली महापालिकेत नियुक्त करण्यात तांत्रिक अडचण येत असे. राम शिंदे यांच्यानंतर महापालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मिळाला नव्हता. मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी या ठिकाणी आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांच्या कानाकोपऱ्यात बेकायदा बांधकामे उभी राहू लागली आहेत.  त्यामुळे थेट आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त झाल्यास प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.