मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. येथील नागरिकांना सर्दी, खोकला, दमा, ताप, थंडी, जुलाब असे आजार सुरू झाले आहे. लहान वयोगटातील मुलांना साथीचे आजार जडले असून डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
 बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही चाळ, झोपडपट्टय़ा तसेच नवीन बांधकामे उभी राहत आहेत तेथे आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील साफसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महत्त्वाच्या चौकांमधील कचराकुंडय़ा अक्षरश: भरून वाहत आहेत. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या कल्याण, डोंबिवलीतील रुग्णालयांमध्ये शहर, ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचारांसाठी रांगा लागल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे हे आजार असल्याने ते साथ रोग म्हणता येत नाहीत, असे पालिका डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फवारणी नाही
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून स्थायी समितीने घनकचरा विभागासाठी गेल्या दोन वर्षांत जंतुनाशक फवारणीसाठी २८ लाख ३५ हजार रुपये मंजूर केले आहेत. महापालिकेच्या सात प्रभागांमध्ये भाडे तत्त्वावरील युनिटद्वारे ही फवारणी होणे आवश्यक असते. पण अशा प्रकारची फवारणी प्रभावी पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. शहरात नियमित जंतुनाशक फवारणी होत नसल्याने साथीचे आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  घनकचरा विभागाची निष्क्रियता या सर्व अव्यवस्थेला कारणीभूत असल्याची टीका होत आहे. दरम्यान, यासंबंधी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लीलाधर मस्के यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शहरात कोणत्याही प्रकारची साथ नाही, असे सांगितले. महापालिका रुग्णालयांमध्ये मुबलक औषधसाठा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.