News Flash

कल्याण-डोंबिवलीच्या नगररचना विभागात नागरिक, सचोटीने काम करणारे विकासक हैराण

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागातील सावळागोंधळ वाढू लागला असून, या विभागात काही विकासकांची कामे नाहक अडवून ठेवली जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

| February 15, 2014 12:39 pm

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागातील सावळागोंधळ वाढू लागला असून, या विभागात काही विकासकांची कामे नाहक अडवून ठेवली जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. या महापालिकेतील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडत असताना नगररचना विभागाने तर या कामात कळस गाठल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. असे असताना काही ठरावीक वास्तुविशारदकांचे आराखडे वेगवेगळ्या त्रुटी दाखवून अडविल्या जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असून, सर्वसामान्य नागरिकांनाही बांधकाम परवानगी देण्यात चालढकल सुरू असल्याचे बोलले जाते.
महापालिकेचा नगररचना विभाग म्हणजे ‘दुभती गाय’ म्हणून ओळखला जातो. माजी आयुक्तांनी यापूर्वी नगररचना विभागातून पिटाळून लावलेला ‘पोकलेन’ नावाचा सव्‍‌र्हेअर पुन्हा मागल्या दाराने या विभागात दाखल झाल्याची चर्चा आहे. या विभागात ‘जादूगार’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याने या विभागात उच्छाद मांडला आहे. माजी
आयुक्तांच्या काळातील डावरे नावाचा सक्षम कर्मचारी बदलून आयुक्त शंकर भिसे यांनी या विभागात हानचाटे नावाचा अभियंता नियुक्त केला आहे. हे सर्व कर्मचारी ‘सरंजामदारा’सारखे या विभागात वावरत असल्याच्या तक्रारी आहेत. विकासकासह नागरिकांची बेसुमार पिळवणूक करीत असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. यामधील काही कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. तीन वर्षांपूर्वी नगररचना विभागात साधा नगररचनाकार असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या महापालिका ह्द्दीत १० बांधकाम प्रकल्पांमध्ये भागीदारीत गृह प्रकल्प सुरू असल्याची पालिकेत चर्चा आहे.
बांधकामाचे दरपत्रक
नगररचना विभागात फाइल फिरवण्यासाठी यापूर्वी जे दरपत्रक पुढे केले जात होते, त्यामध्येही वाढ झाल्याची चर्चा आहे. महापालिका मुख्यालयातून मागणी वाढली असल्याची चर्चा असून त्यामुळे या विभागात दलालांचा वावरही वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अडीच चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर असताना त्या ठिकाणी वाढीव चटई क्षेत्र देऊन मंजूर असलेल्या पाच माळ्यांऐवजी सात ते आठ माळ्यांची भव्य अनधिकृत संकुले उभी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. डोंबिवलीत टंडन रस्त्याला अशी बांधकामे सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. माजी आयुक्तांनी फेटाळलेल्या बांधकाम मंजुरीच्या फाइल नव्याने सादर करण्याऐवजी त्याच फाइल्सवर सकारात्मक असे शेरे घेऊन जुनी प्रकरणे मंजूर करण्याची कामे धडाक्याने सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे नगररचना विभागातील कर्मचारी वतनदारासारखे वागत असल्याची टीका विकासकांकडून केली जात आहे. यासंबंधी महापालिका आयुक्त शंकर भिसे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साहेब कामात आहेत, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2014 12:39 pm

Web Title: kalyan dombivli construction business fed up
Next Stories
1 मनोरुग्णालयातील रुग्णांना मोबदल्याचे धनादेश प्रदान
2 ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलची आज सांगता
3 गणेशाच्या द्वारीही खड्डय़ांचे साम्राज्य
Just Now!
X