असुविधांनी ग्रस्त असलेल्या शास्त्रीनगर आणि कल्याणचे रूक्मिणीबाई रुग्णालय अखेर राज्य सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत या रुग्णालयांमधील व्यवस्थापन केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत या दोन्ही रुग्णालयांमधील व्यवस्थापन पुरते कोलमडले होते. त्यामुळे राज्य सरकारने ही रुग्णालये ताब्यात घ्यावीत, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली असून यामुळे महापालिकेला चपराक बसली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा, औषधांचा अपुरा साठा, नियोजनशून्य असे व्यवस्थापन यामुळे गेल्या अडीच वर्षांत महापालिकेच्या अखत्यारीत येणारी ही रुग्णालये पूर्णपणे ‘अपंग’ झाली होती. महापालिकेतील नगरसेवकांचाही येथील व्यवस्थापनावर अंकुश राहिला नव्हता. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या सामान्य रुग्णांना वाली नाही, असे चित्र येथे पाहावयास मिळत होते. ही रुग्णालये शासनाने ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींकडून केली जात                  होती.  दरम्यान, यासंबंधीचा विषय राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेस आला असता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या तीन महिन्यांत ही रुग्णालये शासन ताब्यात घेईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. त्यामुळे महापालिका प्रशासनाला मोठी चपराक बसली आहे.