कल्याण शहरामध्ये गेली चार वर्षांपासून संवेदना ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला काळा तलाव महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होत असून, यंदा या महोत्सवाचे पाचवे पर्व अधिक रंजक पद्धतीने रसिकांसमोर येणार आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान दिग्गज मान्यवरांचे विचार, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.
काळा तलाव शहरातील अनेक ऐतिहासिक घटनांचा एकमेव साक्षीदार आहे. शहरातील तलावाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काळा तलाव महोत्सवाची सुरुवात झाली. जगदीश खेबुडकर, श्रीधर फडके, बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तींनी यापूर्वी या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे.  या मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी होणारे जलपूजन झाले आहे.
महोत्सवाची सुरुवात १५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते महोत्सवाची सुरुवात आहे. मोहन भागवत यांच्यासह अतुलशास्त्री भगरे यांचेदेखील मार्गदर्शन होणार आहे. १६ जानेवारी रोजी पतंग महोत्सव होणार आहे.
यामध्ये बडोद्यावरून आणलेले पतंग उडवण्यात येणार आहेत. १७ जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या रंगभरणस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर १८ जानेवारी रोजी महिला वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. अभिनेते रमेश भाटकर देखील या महोत्सवात सहभागी होणार आहे. रविवार १९ जानेवारी रोजी अशोक हांडे यांच्या ‘अमृतलता’ या कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे. काळा तलावाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संवेदना ट्रस्टचे दीपक ब्रीद यांनी दिली.