कर्जत-कसारा मार्गावरील अत्यंत अपुऱ्या शटल सेवेमुळे ठाणे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याऐवजी उलट वाढत असल्याने त्यावर उपाय म्हणून ठाण्याला न येताच कल्याणहून थेट वाशीला जाणाऱ्या मार्गाच्या प्रकल्पाची घोषणा नुकत्याच जाहीर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच उशिरा का होईना ठाणे स्थानकातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली अशी प्रवाशांची भावना आहे. या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना कल्याणहून थेट नवी मुंबईला जाता येणार आहे. या नव्या मार्गाचा प्रवास मुंब्रा स्थानकापर्यंत मध्य रेल्वेला समांतरच असेल. पुढे कळवा येथे मात्र दीड किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग टाकून गाडी थेट ऐरोलीला जाईल. त्यासाठी एलिव्हेटेड मार्गावर वरच्या बाजूला आताच्या कोपरसारखे आणखी एक कळवा स्थानक उभारण्यात येईल. अर्थसंकल्पात त्यासाठी ४०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्य आणि हार्बर दोन्ही मार्ग जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रवाशांची सोय होऊन ठाणे स्थानकातील गर्दी आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.  
सध्या नव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. येत्या वर्षअखेरीस ते पूर्ण झाल्यानंतर वाशी-कल्याण प्रकल्पाचे काम सुरू होईल. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून २०१८ पर्यंत या मार्गावर दिवसभरात उपनगरी गाडीच्या ३२ फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यासाठी बारा डब्यांच्या दोन गाडय़ा विकत घेतल्या जाणार आहेत.
उशिराने सुचलेले शहाणपण
ठाण्याहून वाशी तसेच पनवेलपर्यंत उपनगरी सेवा सुरू करताना हार्बर मार्गावरील सर्व प्रवाशांचा अतिरिक्त भार या स्थानकावर येतोय, हे रेल्वे प्रशासनाच्या गावीच नव्हते. प्रवासी संघटनांनी सातत्याने मागणी केल्यानंतर चार वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाण्याहून कर्जत-कसारा मार्गावर ३२ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात आता चार वर्षे उलटली तरीही या मार्गावर शटल सेवेच्या ३२ फेऱ्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. या पाश्र्वभूमीवर उशिरा का होईना शहाणपण सुचून ठाण्याला बायपास करून कल्याणहून थेट वाशीला जाणाऱ्या मार्गाची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली, अशी प्रवाशांची भावना आहे. नवा मार्ग सुरू होईपर्यंत कर्जत-कसारा मार्गावर जास्तीत जास्त शटल फेऱ्या सुरू कराव्यात, अशी सूचनाही प्रवासी संघटनांनी केली आहे.
प्रवासी भारमानाचे बदलते वास्तव  
सकाळी पीकअवरला कर्जत-कसारा मार्गावरून मुंबईकडे तर संध्याकाळी उलट असा प्रवाशांचा ओघ असतो. मात्र आता मुंबईतील बरीचशी कार्यालये नवी मुंबईतल्या उपनगरांमध्ये स्थलांतरित झालेली आहेत. तसेच नवी मुंबई, डोंबिवली तसेच अंबरनाथ येथील औद्योगिक विभागात मोठय़ा प्रमाणात नोकरदार मंडळी मुंबई-ठाण्यातून ये-जा करू लागली आहेत. कर्जत, भिवपुरी, तसेच आसनगांव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांमुळे नवी मुंबई, ठाणे तसेच मुंबईतून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गावर दररोज प्रवास करू लागले आहेत. पूर्वी डाऊन मार्गावर कर्जतकडे जाणारी लोकल अंबरनाथ स्थानकात जवळपास रिकामी व्हायची. आता बदलापूर आले तरी गर्दी कायम असते. अंबरनाथ स्थानकात कधी कधी गर्दीमुळे प्रवाशांना कर्जत गाडीत शिरताही येत नाही. रेल्वे प्रशासनाने या बदलत्या प्रवासी भारमानाचे वास्तव लक्षात घेऊन वेळापत्रकाची आखणी करावी, अशी अपेक्षा प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.