एमजीएम रुग्णालयाची विघ्ने सुटता सुटेनाशी झाली आहेत. ६०० खाटांच्या या रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांमुळे येथील रुग्ण भीतीच्या सावटाखाली आहेत. तसेच येथे चालणारी रुग्णवाहिकेचा गोरखधंदा नुकताच उजेडात आला. यातून एमजीएम प्रशासन वाट काढण्याचा प्रयत्न करतो नाही तोच या रुग्णालयाच्या साडेतीनशे सफाई कामगारांनी सोमवारपासून वेतनवाढीसाठी काम बंदचा पवित्रा घेतला आहे. या कामगारांचे नेतृत्व मंत्री सचिन अहिर हे करीत आहेत. मागील दोन वर्षांपासून वेतनवाढीसाठी हे कामगार रुग्णालय व्यवस्थापनाशी वाटाघाटी करत आहेत.
सफाई कामगारांना महिन्याला सहा ते साडेसहा हजार रुपये वेतन मिळते. किमान अडीच हजार रुपयांची वेतनवाढ मिळण्यासाठी कामगारांनी कामबंदचे हत्यार उपसले आहे. यामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. सुधीर कदम यांना कामगार प्रतिनिधींशी चर्चेसाठी रुग्णालयात यावे लागले. कामगारांच्या लढय़ामुळे रुग्णालयातील स्वच्छतागृहे, शौचालयांमध्ये दरुगधी पसरली आहे. हे रुग्णालय मेडिकल काऊन्सिलच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाखाली चालत असल्याचा दावा यापूर्वी एमजीएम व्यवस्थापनाने केला आहे. परंतु इतर रुग्णालयांच्या तुलनेत येथे मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात घर कसे चालवावे, असा प्रश्न कामगारांच्या प्रतिनिधी देवी माने यांनी विचारला आहे.  कामगारांच्या हक्काचा मोबदला देण्याच्या कात्रीतून सुटका होण्यासाठी कंत्राटदार बदलण्याचे काम व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येते. सध्या या कामगारांचे कंत्राट भरत माने यांच्या मालकीच्या क्लिनिक हॉस्पिटॅलिटी या कंपनीला देण्यात आले आहे.