कामोठे वसाहतीमधील सेक्टर २१ येथील साईप्रेरणा या इमारतीचे बांधकाम व्यावसायिक सुनील पटेल व कंत्राटदार सुरेश पटेल यांना पोलिसांनी अटक केली आहे. या इमारतीच्या जोत्याच्या खांबांची उभारणी सदोष असल्याच्या सदनिकाधारकांच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली.
साईप्रेरणा या तीन मजली इमारतीच्या १२ सदनिकांमध्ये पाच वर्षांपासून नागरिक राहात आहेत. ही इमारत ज्या खांबांवर उभी आहे त्याचे सिमेंट आपोआप निखळून पडत आहे.
या पाश्र्वभूमीवर या इमारतीत राहणे धोकादायक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी सकाळी सर्व सदनिकाधारकांनी एकत्र जमून कामोठे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार व तहसीलदार दीपक आकडे यांनी या इमारतीची पाहणी केली. संबंधित बांधकाम व्यावसायिकालाही तेथे बोलाविण्यात आले. पोलिसांच्या सूचनेवरून विकासकाच्या खर्चातून या सदनिकाधारकांच्या पर्यायी निवासाची सोय करण्यात आली. त्यानंतर इमारत रिकामी झाल्यानंतर सिडकोच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी साईप्रेरणाची पाहणी केली. ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर संबंधित विकासक व कंत्राटदाराला पोलिसांनी अटक केली.
बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, कामात हलगर्जीपणा केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणे, या आरोपांतर्गत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिडकोच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देताना या सर्व बाबी का तपासल्या नाहीत, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी वास्तुविशारदाचीही चौकशी करणार असल्याचे पोलीस अधिकारी मुल्लेमवार यांनी सांगितले.