अंबरनाथ शहरातील जुन्या उत्सवांपैकी एक असणाऱ्या कानसई गणेशोत्सव मंडळाने सातत्याने पर्यावरण स्नेही धोरणाचा अवलंब करून शहरातील इतर गणेशोत्सव मंडळांपुढे आदर्श ठेवला आहे. या मंडळाचे यंदा ४५ वे वर्ष असून गेली १५ वर्षे कार्यकर्त्यांनी श्रींचे आगमन तसेच विसर्जन मिरवणुकांमध्ये गुलाल बंद केला आहे. ठाण्यात कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लगेचच या मंडळानेही कृत्रिम कुंडात विसर्जनाचा पर्याय परिसरातील गणेशभक्तांना उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे फुले आणि अत्तर टाकून येथील विसर्जन कुंडातील पाणी सुगंधित केले जाते. सध्या येथील कुंडात दीड दिवसांचे २५ तर ४० गौरी-गणपतींचे विसर्जन होते. अनंत चतुर्दशीला कुंडामध्ये मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन होते. गेल्या तीन वर्षांपासून मंडळाने मिरवणुका काढणेही बंद केले असून त्याऐवजी विविध लोकनृत्ये सादर केली जातात. दरवर्षी या मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचा प्रसार केला जातो. यंदा डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
सकस सांस्कृतिक कार्यक्रम
स्थानिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन कानसई मंडळ सातत्याने गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरून सकस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असते. याच व्यासपीठावरून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या विशाखा सुभेदार, महेश सुभेदार, इरावती लागू, निरंजन कुलकर्णी या कलावंतांनी आता व्यावसायिक सिनेमा, टी.व्ही. मालिका तसेच नाटय़ वर्तुळात आपले स्थान निर्माण केले आहे. गिरीश पंडित, जगदीश हडप यांसारखे हौशी रंगभूमीवरील कलावंतही या मंडळाच्या कार्यक्रमातून घडले. भाई इंगळे ऊर्फ भाईमामा हे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून अगदी स्थापनेपासून ते उत्सवात कार्यरत आहेत. गिरीश सोमणी, राजेंद्र वाणी, जयंत कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा वैशिष्टय़पूर्ण उत्सव पार पडतो. उत्सवात यंदा १२ आणि १३ सप्टेंबर रोजी एकांकिका स्पर्धा तर १५ सप्टेंबर रोजी ‘बाल स्वरगंधा’ ही स्थानिक बाल गायकांच्या वाद्यवृंदाची मैफल आयोजित करण्यात आली आहे.
मोरया प्रतिष्ठानचा शिस्तबद्ध ढोल
सार्वजनिक गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती दूर करून त्याला शाश्वत मूल्यांची जोड देण्यासाठी गेल्या वर्षी अंबरनाथमधील तरुणांनी मोरया प्रतिष्ठानची स्थापना केली. ‘आपली संस्कृती आपली शान, आपले उत्सव आपला मान’ असे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. प्रतिष्ठानच्या काही सदस्यांनी पुण्यातील ढोल पथकापासून प्रेरणा घेत अंबरनाथमध्येही ढोलपथक स्थापन केले असून अल्पावधीतच त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या कार्यक्रमात ‘मोरया..’च्या पथकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. सध्या प्रतिष्ठानमध्ये ६० तरुण असून त्यातील काही शिकतात तर काही नोकरी करतात. ढोल वादनाचे कार्यक्रम करून मिळणारे पैसे विविध सामाजिक संस्थांना दिले जातात. तसेच त्यातूनच समूहातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते.     
गणपती बाप्पांना डॉलरचा फटका
प्रतिनिधी, कल्याण
डॉलरच्या किमती चढय़ा राहिल्याने त्याचा चालू वर्षी गणपती बाप्पांना फटका बसला आहे, अशी माहिती टिटवाळ्यातील प्रसिद्ध मूर्तिकार भाई गोडांबे यांनी दिली. गोडांबे यांच्या गणपती कारखान्यातील मूर्ती अमेरिका, दुबई, इंग्लड येथे पाठविल्या जातात.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस, बेस कलर, मित्ता कलर, वेलवेट, झिंक या कच्च्या मालाच्या किमती यावेळी डॉलर चढा राहिल्याने वाढल्या आहेत. त्याचा गणपतीसाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर परिणाम झाला आहे. गेल्या ५३ वर्षांपासून गोडांबे कुटुंब टिटवाळ्यात गणपती मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करीत आहे. देशाच्या विविध भागांत त्यांच्या मूर्तीना मागणी आहे.