21 October 2018

News Flash

सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे

सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे आणि उपमहापौरपदी प्रशांत पाटील-मजलेकर यांची बुधवारी निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे महेंद्र सावंत आणि धीरज सूर्यवंशी यांचा ४२ विरुद्ध

| August 15, 2013 02:02 am

सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे आणि उपमहापौरपदी प्रशांत पाटील-मजलेकर यांची बुधवारी निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे महेंद्र सावंत आणि धीरज सूर्यवंशी यांचा ४२ विरुद्ध २५ अशा १७ मतांनी पराभव करीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली. महापौर-उपमहापौर निवडीच्या मतदानात सहभागी न होता दोन अपक्षांसह स्वाभिमानी आघाडीच्या ११ सदस्यांनी तटस्थ भूमिका बजावली.
सांगली महापालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी महापौर-उपमहापौर निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित सदस्यांची बठक बोलाविली होती. बठक सुरू होताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी महापौर-उपमहापौरपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्धा तासाचा वेळ देण्यात आला. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती शुभांगी देवमाने यांनी महापौरपदासाठी आणि जुबेर चौधरी यांनी उपमहापौरपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे श्रीमती कांचन कांबळे आणि महेंद्र  सावंत यांच्यात महापौरपदासाठी, तर प्रशांत पाटील-मजलेकर व धीरज सूर्यवंशी यांच्यात सरळ लढत झाली. पिठासीन अधिकारी कुशवाह यांनी हात उंचावून सदस्यांची मते घेतली. यामध्ये काँग्रेसच्या कांचन कांबळे व प्रशांत पाटील यांना 42 मते मिळाली, तर पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना २५ मते मिळाली.
निवडीनंतर नूतन महापौर श्रीमती कांबळे व उपमहापौर श्री. पाटील यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील, काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार, माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
महापौरपदी निवड झाल्यानंतर श्रीमती कांबळे यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना महापालिका आपली आहे असे वाटणारे निर्णय घेतले जातील. जनतेने काँग्रेसवर जो विश्वास व्यक्त केला आहे तो सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. काँग्रेसचे नेते मदन पाटील यांनी एका मागासवर्गीय महिलेला दिलेली संधी म्हणजे माझा गौरवच समजते.
महापौर-उपमहापौर निवडीनंतर महापालिका आवारात फटाक्यांची आताषबाजी व गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी आपला आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महापौर श्रीमती कांबळे व उपमहापौर श्री. पाटील यांनी मिरवणुकीने जाऊन सांगलीचे आराध्य दैवत श्रीगणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर  त्यांनी  कृष्णाकाठी असणाऱ्या वसंतदादांच्या स्मारकाला अभिवादन केले.

First Published on August 15, 2013 2:02 am

Web Title: kanchan kamble mayor of sangli