मराठी माध्यमात मुलांना शिकविण्याच्या पालकांच्या अनास्थेपोटी एकीकडे मराठी शाळा दारोदारी फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचा आग्रह करीत असताना कांदिवलीच्या डहाणूवाडीतील ‘बालक विहार’ या अनुदानित शाळेत मात्र संस्थाचालकच विद्यार्थी येऊच नये म्हणून देव पाण्यात टाकून बसले आहेत. ही ४० वर्षे जुनी शाळा येनकेन प्रकारेण बंद करण्याचा संस्थाचालकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये ‘प्रवेशबंदी’ची फलकबाजी करून खोडा घालण्याचे काम संस्थाचालकांकडून सुरू आहे. आश्चर्य म्हणजे त्यासाठी संस्थाचालकांनी पोलिसांचीही मदत घेतली आहे.

शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी मुख्याध्यापकांनी शाळेबाहेर पाचवी ते दहावीचे प्रवेश सुरू असल्याचा फलक काही दिवसांपूर्वी लावला. पण संस्थाचालकांनी तो फलक काढायला लावला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पुन्हा तसाच फलक लावला, तर संस्थाचालकांनी त्याच्या शेजारी दुसरा फलक लावून मुख्याध्यापकांचा फलक बेकायदेशीर असून तो दुर्लक्षित करण्यात यावा, असा मजकूर लिहिला आहे. इतकेच नव्हे तर ‘पाचवी आणि सहावीचे वर्ग बंद झाले असून गेल्या दोन वर्षांच्या अनुभवावरून सातवीचा वर्ग निघणे शक्य नाही. तसेच निकालानंतर आठवी ते दहावीच्या प्रवेशाचा विचार होईल. याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर कळविले आहे,’ अशी इशारेवजा सूचना करून मुलांनी आपल्या शाळेत प्रवेशच घेऊ नये यासाठीचा बंदोबस्त करून टाकला आहे. हा फलक वाचल्यानंतर कुठल्या पालकाची आपल्या मुलाला या शाळेत पाठविण्याची हिंमत होईल..
मुळात पाचवी-सहावीचे वर्ग बंद पाडण्यातही संस्थाचालकांचाच हात होता. २०१२-१३ मध्ये शाळेने चौथी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचवीला प्रवेशच नाकारले होते. मुलांनी शाळा सोडून जावे यासाठी त्या वेळी निकालाबरोबरच पालकांच्या हातावर थेट शाळा सोडल्याचा दाखला टेकविण्यात आला होता. तत्कालीन मुख्याध्यापक मर्जीतले असल्याने हे उद्योग करता येणे संस्थाचालकांना शक्य झाले. परंतु आर्थिक गैरव्यवहार, शिक्षकांच्या वेतनाची बिले शिक्षण विभागाकडे सादर करताना केलेल्या अफरातफरीमुळे या मुख्याध्यापकांची उचलबांगडी झाल्याने आता संस्थेला शिक्षण विभागाच्या आदेशामुळे नाइलाजाने शाळेत सेवेत ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांकडे मुख्याध्यापक पद सोपवावे लागले आहे. नव्याने आलेले मुख्याध्यापक शाळेत मुलांनी प्रवेश घ्यावा यासाठी प्रयत्नशील असताना संस्थाचालक मात्र त्यांच्या प्रयत्नांवर अशी फलकबाजी करून पाणी टाकत आहेत.
मुंबईत सरकारी अनुदानावरील बहुतांश शाळा मराठी आहेत; परंतु इंग्रजी माध्यमाच्या आग्रहापोटी या शाळा एकामागोमाग एक बंद पडत आहेत. एक प्रकारे अनुदानित शिक्षणाचा पर्यायाने गरीब मुलांना जवळपास विनाशुल्क शिकण्याचा मार्गच त्यामुळे बंद होत चालला आहे. कारण फारच थोडय़ा इंग्रजी माध्यमाच्या शाळा या सरकारच्या अनुदानावर आहेत. त्यातूनही आपली शाळा बंद पडू नये म्हणून एप्रिल-मे महिन्यात अनेक मराठी शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक वस्त्यावस्त्यांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये फिरून आपल्या मुलांना शाळेत दाखल करावे यासाठी पालकांच्या भेटीगाठी घेत असतात. डॉ. राममनोहर लोहिया यांचे नाव वापरून संस्था चालविणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या संस्थाचालकांचे हेतू नेमके उलट आहेत.
याबाबत संस्थेचे कार्यवाह प्रकाश बंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाचवी-सहावीचे वर्ग बंद करण्याबाबत आपण शिक्षण विभागाला कळविले आहे. विद्यार्थीच येत नसल्याने या वर्षी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू होतील की नाही, याबाबत शंका आहे, असा खुलासा त्यांनी केला. तसेच शाळा बंद पडण्याचे सगळे खापर त्यांनी आपल्या शिक्षकांवरच फोडले.