कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला २१२ एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. सोमवारी तीन तासांसाठी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने केंद्र बंद झाले. त्यामुळे कमी दाबाने पूर्व, उत्तर व दक्षिण नागपूरला पाणीपुरवठा झाला. या केंद्राचा विद्युत पुरवठा सहा महिन्यांत तब्बल ६३ वेळा खंडित झाला आहे. महावितरणकडून ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी एक्सप्रेस फिडरच्या कामाला गती द्यावी हे मागणीचे निवेदन सोमवारी ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना फॅक्सद्वारे दिल्याची माहिती सुधाकर कोहळे यांनी दिली.
महावितरणकडून या जलशुद्धीकरण केंद्राला कन्हान येथील वीज उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. विद्युत पुरवठा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वारंवार खंडित होतो. एकदा ट्रिपींग झाले तर केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी एकातासापेक्षा जास्त अवधी लागत असल्याने प्रचंड नुकसान होते. मनपाने विद्यत पुरवठा बाधित होऊ नये यासाठी  स्वतंत्र फिडर उभारण्याची तयारी दर्शविली असून त्यासाठी ३.४६ कोटी रुपयांचा भरणाही करण्यात आला आहे. महावितरणने कामाची किंमत वाढल्याचे सांगून आणखी ६३ लाख रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु अजूनही महावितरणने कामाला सुरुवात केली नाही. प्रकल्पाची किंमत वाढल्यास ती भरण्यासंबंधातील हमीपत्राची मागणी महावितरणकडून करण्यात आली.  हमीपत्र भरण्याची तयारी मनपाने दाखविली असल्याची माहिती कोहळे यांनी दिली.
सहा महिन्यांचा विचार केल्यास ऑक्टोबर २०१२मध्ये आठ वेळा, नोव्हेंबरमध्ये १३, डिसेंबरमध्ये ६, जानेवारी २०१३मध्ये ६, फेब्रुवारी १६ तर मार्चमध्ये १३ वेळा आणि आता सोमवारीसुद्धा विद्युत पुरवठा खंडित झाला. साडेतीन तास सोमवारी वीज नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रभावित झाले. अशीच स्थिती कायम राहिल्यास शहरातील काही भागात उन्हाळ्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती एनईएसएलचे संचालक सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केली.