कराड दक्षिणच्या डोंगरी भागामध्ये गाव तिथे तलाव ही संकल्पना प्रत्यक्ष अस्तितवात आल्याने पूर्वी टंचाईग्रस्त असणारी गावे सध्या पाण्याने समृध्द बनली असून, जलसंधारणाचे कामामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल ठरल्याचे प्रतिपादन रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांनी केले.
लटकेवाडी (ता. कराड) येथे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या प्रयत्नातून ३५ लाख रूपये खर्चाच्या जुन्या साठवण तलावाच्या दुरूस्ती कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकरी ए. एस. पटेल, सहायक अभियंता भंडारे, पंचायत समिती सदस्या राजश्री थोरात, सरपंच कांताबाई चव्हाण उपस्थित होते.
पाटील म्हणाले की लटकेवाडी हे डोंगरावर वसलेले ५०० ते ७०० लोकवस्तीचे गाव. मात्र, पाण्याची सुविधा नसल्याने गावाला पाण्यासाठी मौलोनमैल पायपीट करावी लागत होती. महिलांना तर पाण्याचे हंडे घेऊन तीन, चार किलोमीटरचा डोंगर चढून यावे लागत होते. आमदार विलासराव पाटील यांच्या माध्यमातून येथे मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. मंडल कृषी अधिकरी ए. एस. पटेल यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व्ही. एम. भोसले यांनी केले. आभार संजय साळुंखे यांनी मानले.