चोखंदळ पुणेकरांना कराड अर्बन बँकेची सेवा पसंत पडल्यानेच बँकेच्या पुण्यात दहा शाखा चांगल्याप्रकारे कार्यरत आहेत. येत्या काळात पुण्याचा वेगाने विस्तार होणार असल्याने बँकेसाठी ही संधी निर्माण झाली असून, पुढील दहा वर्षांत बँकेच्या पुण्यात २५ शाखा झाल्यास नवल वाटू नये. मात्र, त्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे, सेवकवर्गाला प्रशिक्षण देणे इत्यादी बाबी बँकेला कराव्या लागणार असल्याचे कराड अर्बनचे माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी सांगितले.
कराड अर्बनच्या पुणे येथील कर्वे रोड शाखेचा १४ वा वर्धापनदिन व या शाखेतील व्यवसाय १०० कोटींवर गेल्याबद्दल आयोजित ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष सुभाषराव एरम, ज्येष्ठ संचालक सी. व्ही. दोशी,  मुख्य कार्यकारी अधिकरी सीए. दिलीप गुरव, कर्वे रोड शाखेचे व्यवस्थापक रवींद्र कांबळे, तसेच कराड अर्बनचे पुण्यातील सर्व शाखांचे व्यवस्थापक, ग्राहक व सभासदांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. एरम म्हणाले की, कराड अर्बन बँकेने ग्राहकांना उत्तम व कार्यक्षम सेवा दिल्यानेच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. येत्या काळात प्रगत तंत्रज्ञानाने कार्यक्षमता वाढवून ग्राहकांना आणखी चांगली सेवा देण्यात येईल,
मेळाव्यात ग्राहक व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना तसेच सूचनांना दिलीप गुरव यांनी उत्तरे देताना, बँकेच्या नव्याने सुरू होत असलेल्या सुविधांची माहिती दिली.