हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही सध्याच्या औद्योगिकीकरणात रोजगार निर्मिती होताना दिसत नाही, मात्र केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून मुंबईच्या ससून डॉक या मच्छीमार जेटीला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या करंजा जेटीच्या उभारणीत निधी कमी पडल्याने काम बंद करण्यात आल्याने, या जेटीच्या निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या २५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांना येथील जनतेला मुकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर वारंवार मागणी करूनही केंद्र तसेच राज्य सरकारही दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील हजारो मच्छीमारांनी मच्छीमारी केल्यानंतर मुंबईच्या ससून डॉकमध्ये मासळी उतरवितात, त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा मच्छीमारांकडून केल्या जात होत्या. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या ६४ कोटी रुपयांच्या अनुदानातून करंजा बंदरात ससून डॉकला पर्याय म्हणून जेटीची उभारणी केली जात आहे. त्यामुळे रायगडसह कोकणातील हजारो मच्छीमारांची लूट थांबणार असून, मच्छीमारांचे अनेक प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे, मात्र मच्छीमार जेटीचे काम सुरू असताना या जेटीच्या परिसरात खडक आढळल्याने जेटीच्या उभारणीच्या कामाच्या बजेटमध्ये वाढ झाल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी दिली आहे.
जेटीचे बजेट वाढल्याने निधीत वाढ व्हावी यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र वर्षभरापासून या जेटीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच निवडणुका असल्याने नेते लक्ष देणार का असा सवाल करंजा येथील आकाश भोईर यांनी केला आहे. करंजा येथील प्रस्तावित मच्छीमार जेटीमुळे हजारो मच्छीमार बोटींना मच्छीमारीनंतर मच्छी उतरविण्याची सोय, मच्छीसाठी बर्फ फॅक्टरी, स्वतंत्र मच्छी साठवणूक गोदाम, मच्छीच्या खरेदी-विक्रीची सोय, मासळीच्या वर्गवारीसाठी कर्मचारी, मच्छीमारांना राहण्या-खाण्याची सोय, मच्छी वाहण्यासाठी लागणारी वाहने अशी एकूण पंचवीस हजार प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार असल्याने, करंजा मच्छीमार जेटीच्या उभारणीची गरज निर्माण झाली आहे.