रायगड जिल्ह्य़ाची राजधानी असलेल्या अलिबागला जोडणाऱ्या उरण तालुक्यातील करंजा ते रेवस (अलिबाग) अशी महाराष्ट्र मेरिटाइमच्या देखरेखीखाली जलप्रवासासाठी बोट सेवा चालविली जात आहे. या जल प्रवासाकरिता वापरण्यात येणाऱ्या एका बोटीला काही दिवसांपूर्वी करंजा जेटीजवळ जलसमाधी मिळालेली होती. यामुळे शेकडो प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या बोटीबाबतच शंका व्यक्त केली जात असल्याने करंजा ते रेवस असा जलप्रवास धोकादायक बनू पाहात आहे. उरण ते अलिबाग हे साठ किलोमीटरचे अंतर रस्त्याच्या मार्गाने पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत. करंजा ते रेवस या जलमार्गाने अवघ्या पंधरा मिनिटांत रेवस व त्यांनतर पाऊण तासात अलिबागला पोहचता येते. त्यामुळे वेळेबरोबरच पशांचीही बचत होते. पंधरा मिनिटांच्या जलप्रवासासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून साडेसात रुपये आकारले जात आहेत. मात्र गेली अनेक वष्रे या जलप्रवासासाठी वापरात असलेली बोट नादुरुस्त होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. तसेच बोटीतून प्रवासी वाहतुकीची परवानगी असताना मोटारसायकलींचीही वाहतूक केली जात आहे. मोटारसायकली वाहतुकीसाठी अधिक पसे मिळत असल्याने प्रवाशांची सुविधा न पाहता वाहनांना प्राधान्य दिले जात असल्याचे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी करंजा येथे प्रवासी शेडचीही वाणवा असल्याने भर उन्हात प्रवाशांना उभे राहून बोटीची वाट पाहावी लागत आहे. या मार्गावरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दक्षता घेण्याची मागणी या मार्गावरील प्रवाशांकडून केली जात आहे.