News Flash

विद्यार्थ्यांमधील सृजनतेचा आविष्कार

पास्कलचा सिध्दांत वापरून तयार करण्यात आलेले स्टेअरिंग.. केवळ आवाजाच्या चढ-उतारावर सुरू होणारी बाईक..

| March 14, 2015 06:55 am

पास्कलचा सिध्दांत वापरून तयार करण्यात आलेले स्टेअरिंग.. केवळ आवाजाच्या चढ-उतारावर सुरू होणारी बाईक.. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधणारी यंत्रणा..  सृजनतेला वाव देणाऱ्या अशा विविध समाजोपयोगी कल्पनांचा आविष्कार नाशिककरांना पाहता आला. निमित्त होते, ‘कर्मवीर एक्सपो-२०१५’चे.
क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय आय.ई.टी ‘कर्मवीर एक्सपो-२०१५’ स्पर्धेस शुक्रवारी सुरूवात झाली. स्पर्धेत देशभरातून ९०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत यावर विविध चलतयंत्रे सादर करण्यात आले. येवला येथील एस.एन.डी. तंत्रनिकेतनच्या नीलेश ठोके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘कॅप्टीव्ह पॉवर जनरेशन’ चलतयंत्र तयार केले आहे. त्यात ‘जीम’मध्ये ‘वर्कआऊट’साठी वापरण्यात येणाऱ्या माध्यातून वीज निर्मिती केली जाते. या यंत्राच्या माध्यमातून २४ व्होल्ट वीज तयार होत असून बॅटरी चार्जिंग करणे, सीएलएफ बल्प वापरता येतात. के. के. वाघच्या यज्ञेश भोर आणि सहकाऱ्यांनी ‘बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅण्ड रिफ्युजन रोबो’ तयार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब आढळल्यास तो निकामी करताना अधिक धोका संभवतो. यासाठी स्वयंचलित रोबो जो बॉम्ब शोधेल, त्यातील घटक पाहून तो उचलून विशिष्ट अंतरावर जात निकामी करेल अशी व्यवस्था केली आहे. त्याचा उपयोग लष्करी तसेच पोलीस विभागाला करता येईल. कर्मवीर बाबुराव ठाकरे महाविद्यालयाच्यावतीने स्वप्नील शर्मा, अमोल धोंगडे आणि अविनाश पटेल यांनी आवाजाच्या तीव्रतेवर आपोआप सुरू होणारी बाईक तयार केली आहे. दोन किंवा तीन व्यक्तींचे आवाज नोंदवत यातून आवाजाच्या तीव्रतेवर गाडी सुरू करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या स्वप्नील कांबळेने पास्कलचा सिध्दांत वापरत ‘पॉवर स्टेअरींग’ तयार केले आहे. जे बाजारात मिळणाऱ्या स्टेअरिंगपेक्षा कमी खर्चिक आणि इंजीनची उपयुक्तता वाढविणारे असल्याचा दावा त्याने केला. असे अनेक अविष्कार प्रदर्शनास पहावयास मिळतात.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी कॅटाफारमा केमिकल्सचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत कारवा यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ,  एम.एस.एस. इंडियाचे महाव्यवस्थापक मंगेश नटाल, कोसो इंडियाचे अध्यक्ष उमेश वानखेडे, इलेक्ट्रोफॅबचे युत्कर्षां सांगवी आदी उपस्थित होते. डॉ. कारवा यांनी कल्पना तंत्रज्ञानानाने बदलतील आणि स्वतवर विश्वास ठेवून काम केले तर एक दिवस तंत्रज्ञानही बदलेल असे नमूद केले.
क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी संस्थेची माहिती दिली. विद्युत विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. ई. कुशारे यांनी अपांरपारिक ऊर्जा स्त्रोत केंद्रस्थानी ठेवून प्रयत्न केल्यास पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात आपल्या तरूण तंत्रज्ञांचा खऱ्या अर्थाने सहभाग असेल असे नमुद केले.
 स्पर्धेतील विजेत्यांसाठी तीन लाखांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. पुढील दोन दिवस हे अनोखे प्रदर्शन पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 6:55 am

Web Title: karmaveer expo 2015
टॅग : Technology
Next Stories
1 एसटी प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञानाचा नाहक मनस्ताप
2 पेपर फुटीच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन
3 कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उद्यापासून‘रंगालय’ उपक्रम
Just Now!
X