सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर पलीकडील कर्नाटक सीमा भागातील शेतकरी विद्युत मोटारी लावून या बंधाऱ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा करीत असल्याबद्दल कर्नाटक शासनाशी संपर्क साधून तेथील विद्युत पुरवठा खंडित करावा म्हणून महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यास कर्नाटक शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
सोलापूरसाठी यापूर्वी कर्नाटकातील आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले असता त्यास कर्नाटक शासनाने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर आता उजनी धरणातून सोलापूरकरांना पिण्यासाठी सोडलेले पाणीही भीमा नदीच्या कर्नाटक हद्दीतून राजरोसपणे चोरून नेले जात असताना त्याबद्दल कर्नाटक शासन महाराष्ट्र शासनाला सहकार्य करायला तयार नसल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली.
शनिवारी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी  मुख्यमंत्र्यांचे सोलापुरात विमानाने आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांच्या समवेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील होते.
तहानलेल्या सोलापूरसाठी पुणे जिल्ह्य़ातून पाणी देता येत नसल्याने त्याऐवजी आलमट्टी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाकडून गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून प्रयत्न सुरू होता. परंतु त्यास कर्नाटक शासनाने नकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शेवटी सोलापूरसाठी उजनी धरणातून पाणी सोडावे लागले. पंरतु हे सोडलेले पाणी भीमा नदीच्या औज बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर भीमेच्या पलीकडील कर्नाटक हद्दीतील शेतकरी दिवस-रात्र विद्युत मोटारी लावून हे पाणी राजरोसपणे पळवित आहेत. तर इकडे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हे पाणी घेण्यास कडक बंधने घालण्यात आली आहेत. पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांविरुध्द फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीयन शेतकरी भीमा नदीतील पाणी घेऊ शकत नाही, तर याउलट, कर्नाटकातील शेतकरी पाण्यावर दरोडा घालत आहेत. त्यांच्यावर राज्याच्या हद्दीच्या प्रश्नामुळे महाराष्ट्र शासन कारवाई करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजेच सोलापूर परिसरातील महाराष्ट्रीयन शेतकरी पाण्याअभावी उपाशी आहे, तर सोलापूरचे हक्काचे पाणी चोरणारे कर्नाटकातील शेतकरी तुपाशी आहेत. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री चव्हाण हेच हतबल असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूर शहराचा पाणी प्रश्न हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
——–
चौकट
—–
दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सोलापूर शहरवासियांना पिण्यासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्याच्या परिसरातील पाणी शेतीसाठी उपसा करण्यास शासनाने बंदी घातली असून त्यासाठी कठोर कारवाईची मोहीमही हाती घेतली आहे. त्याचवेळी शेजारच्या कर्नाटकातील शेतकरी राजरोसपणे हे पाणी पळवून नेत असनाता इकडे पाण्याअभावी शेतातील पिके जळत आहेत. या पाश्र्वभूमीवर दुष्काळ व कर्ज थकबाकीला कंटाळून दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांवरील पाण्यासाठीचे बंधन उठवावे, अशी मागणी होत आहे.