‘कारवी’ची ‘खरवर’ जातीची वनस्पती पाचगणी पॉल हॅरिसन दरी फुलल्याने ही सारी दरीच जांभळय़ा रंगात न्हाहली आहे. कारवीची ही जात दर सोळा वर्षांनंतर फुलत असल्याचे वनस्पती अभ्यासकांनी सांगितले.
कारवी या वनस्पतीचे महत्त्वाचे चार ते पाच प्रकार असून प्रत्येक प्रकाराची कारवी फुलण्याची वेगवेगळी वर्षे आहेत. त्यात ‘कारवी व्हाईटी’ हा प्रकार दर सात वर्षांने फुलतो, तर ‘आकरा’ हा प्रकार दर चार वर्षांने फुलतो. सध्या या पठारावर फुललेला ‘खरवर’ हा प्रकार प्रत्येक १६ वर्षांनी फुलतो. अ‍ॅकॅन्थॅसिया कुटुंबातील ही स्टॉबीलँन्धस प्रजातीत मोडणारी वनस्पती आहे. यापूर्वी  ही खरवर वनस्पती १९९७ च्या सुमारास फुलोऱ्यावर होती. त्यानंतर यावर्षी ही वनस्पती व तिचा फुलोरा पाहण्याचा योग स्थानिकांसह वनस्पती अभ्यासक, मधपाळ शेतकरी यांना येत असल्याने त्यांच्यात अत्यंत समाधानाचे वातावरण पहाण्यास मिळत आहे.
कारवी व तिचे सर्व प्रकार हे महाबळेश्वर पांचगणी या पर्यटनस्थळांच्या पठारांवर, डोंगरदऱ्यातून मोठय़ा प्रमाणावर आढळून येणारी वनस्पती आहे. कारवीच्या काठय़ा स्थानिक लोक पावसाळी वातावरणापासून आपल्या इमारतींच्या संरक्षणार्थ तयार करणाऱ्या गवतांच्या झडपांमध्ये (झडय़ामध्ये) वापरतात तर कारवी-खरवरचा फुलोरा म्हणजे मधमाश्यांसाठी मध गोळा करण्यासाठी पर्वणीच असते. या वर्षी खरवरचा फुलोरा या पठारावर फुलल्याने यावर्षी येथे खरवरचा मध मोठय़ा प्रमाणावर गोळा होणार असून यामुळे या भागातील मधपालही खूश आहेत. साधारणपणे हा फुलोरा महिना दीड महिना असाच रहात असून त्यात दिवसेंदिवस वाढच होत जाते.
महाबळेश्वरवरून पांचगणी मार्गे वाईकडे जात असता पाचगणी पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर दांडेघर गाव आहे. दांडेघर गावापासून ते पांचगणीच्या थाप्यापर्यंत (पॉल हॅरिसन दरीपर्यंतच्या) एक ते दीड कि.मी.च्या पट्टय़ातील डावीकडील बाजूस वळणावळणाचा रस्ता (घाट) लागतो. या घाट रस्त्याच्या दरीत सध्या आपल्याला फुललेल्या खरवर फुलांचे ताटवे पहावयास मिळतात.