कस्तुरबा गांधी यांचा जीवनपट कथक नृत्यातून उलगडला जाणार आहे आणि त्याला जोड मिळणार आहे जॅझ संगीताची!  ‘नादरूप’ या नृत्य प्रशिक्षण संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘द कॉन्फ्लूयन्स- पीड परायी जाने रे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने नादपूर्ण भारतीय नृत्य-संगीत आणि पश्चिम युरोपीय संगीत यांचा अनोखा मिलाफ रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘नादरूप’ च्या संस्थापक आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कस्तुरबांचा महात्मा गांधींशी विवाह झाला तेव्हाचा त्यांच्या आयुष्यातील अल्लड काळ, पुढे गांधी दक्षिण आफ्रिकेस गेल्यावर कस्तुरबांच्या जीवनात झालेला बदल आणि महात्मा गांधी व पुत्र हरिलाल यांच्यातील मतभेदांमुळे झालेली त्यांची कुचंबणा, या प्रवासाचे सादरीकरण या कार्यक्रमात नृत्य व संगीताच्या आधारे करण्यात येणार आहे. जॅझ संगीतातील प्रसिद्ध कलाकार मॅनफ्रेड वेइनबर्गर आणि अल्फ्रेड व्होलाबाऊर यांच्यासह ‘अपर ऑस्ट्रिया यूथ जॅझ ऑर्केस्ट्रा’ या बँडचे सदस्यही यात सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम २३ नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून तो सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकांचे वाटप २२ व २३ तारखेला बालगंधर्व येथेच ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केले जाणार आहे.