सई परांजपे यांच्या चित्रपटाचा रिमेक होणार
सई परांजपे निर्मित आणि दिग्दर्शित ‘कथा’ हा चित्रपट खूप गाजला होता. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता पुन्हा एकदा रिमेक प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेता मनीष पॉल हा पुन्हा एकदा ‘कथा’ सादर करणार आहे. नासिरुद्दीन शहा, फारुख शेख, दीप्ती नवल यांचा सहज अभिनय आणि सई परांजपे यांचा खास स्पर्श असलेला मूळचा ‘कथा’ चित्रपट अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
सई परांजपे यांचा हा चित्रपट हिंदी असला तरी चित्रपटात संपूर्ण वातावरण आणि पात्रे ही मराठी दाखविली होती. त्यामुळे चित्रपटातील पात्रांची नावे ही राजाराम पी. जोशी (नासिरुद्दीन शहा), संध्या सबनीस (दीप्ती नवल), भाऊसाहेब (फारुख शेख) अशी होती. मुंबईतील मध्यमवर्गीय, त्यांचे भावविश्व आणि चाळ संस्कृतीचे दर्शन या चित्रपटात दाखविण्यात आले होते.  सध्याच्या बॉलीवूडमधील चित्रपटांच्या पठडीत हा चित्रपट आणि त्याचे वातावरण बसणारे नसले तरीही ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘कथा’ चित्रपटाचा रिमेक करावा, असे मनीष पॉलला वाटले, यातच या चित्रपटाचे यश असल्याचे मानले जाते. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या या ‘कथा’चे दिग्दर्शन खलील मोहंमद यांनी केले आहे.
‘कथा’ रिमेकबाबत आपण खूप उत्सुक असून तो कसा होईल अशी थोडी भीतीही मनात वाटते आहे. पहिल्या दिवशी चित्रीकरणाला सुरुवात करताना मनावर थोडे दडपणही होते; पण या नव्या चित्रपटाच्या कामात आपण खूश आहोत, असे पॉलने ‘ट्विट’ करून जाहीर केले आहे. ‘कथा’ या चित्रपटातून भारतीय संस्कृतीमधील ‘ससा आणि कासव’ यांची पारंपरिक गोष्ट आणि त्याचे तात्पर्य मांडण्यात आले होते. तोच धागा आत्ताच्या काळाला अनुसरून ‘कथा’चा रिमेक केला जात आहे.