मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या शिकारीचे प्रकरण गाजत असतानाच एका अस्वलाचीही लोखंडी सापळ्यात फसल्याने शिकार झाल्याचे नवे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पांमध्ये ‘कटनी गँग’चा शिरकाव धोक्याचा ठरणार असल्याचा इशारा मिळाला आहे.
 घटांग वनक्षेत्रात वाघ पकडण्यासाठी शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात एक अस्वल अडकल्यानंतर त्याची शिकार करून विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती चिकू आणि बडलू या अटकेतील शिकाऱ्यांकडून मिळाल्याने वन विभाग चक्रावला आहे. अस्वल सापळ्यात अडकेल याची पूर्वकल्पना शिकारी टोळीला नव्हती. मात्र, अस्वल अडकले आणि त्यानंतर वाघ या सापळ्यात सापडला अशी माहिती पुढे आली आहे. गेल्या ६ जून रोजी वन विभाग, वन्यजीव संरक्षण संस्थेने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नागपूरच्या मनसर गावात केलेल्या संयुक्त कारवाईत बडलू आणि चिकू या दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
मेळघाटात वाघाची शिकार केल्याची कबुली दोन्ही शिकाऱ्यांनी दिली असून त्यांच्याकडून आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. घटांग येथील घटनास्थळावरून लोखंडी सापळा, हाडाचे तुकडे आणि मांस जप्त करण्यात आले असून हैदराबादच्या न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेत अधिक चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कटनी गँगच्या दोन सदस्यांना सोमवारी घटांग येथे नेण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळ दाखविले आणि त्याच ठिकाणी वाघाची विल्हेवाट लावल्याची कबुलीही दिली, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कुख्यात बहेलिया टोळीचा एका शिकारी सिरी यालासुद्धा वन विभागाने ताब्यात घेतले असून त्याचा तीन दिवसांचा वन विभाग कोठडी रिमांड मिळाला आहे. त्याला अकोलानजीकच्या उबवा येथून अटक करण्यात आली होती. तो तेव्हापासून तुरुंगात होता. तुरुंगातून सुटताच मंगळवारी घटांग वाघ शिकार प्रकरणी वन विभागाने त्याला ताब्यात घेऊन स्थानिक न्यायालयातून त्याचा रिमांड मिळवला. सिरी हा वाघांच्या शिकारी प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असून त्यानेच चिकू आणि बडलू यांना शिकारीसाठी उद्युक्त केल्याचा संशय आहे.
या तिघांनाही सामोरासमोर आणले असता त्यांनी परस्परांना ओळखण्यास नकार दिल्याचे समजते. सिरी हा मुरलेला शिकारी आणि गुन्हेगार असून तपास कामी सहकार्य करीत नसल्याने वन विभाग हतबल झाला आहे. ही टोळी एकूण ३० सदस्यांची आहे. त्यांनी विदर्भातील पाच वाघांचे गेल्या तीन महिन्यांच्या काळात हत्या करून त्यांची कातडी, हाडे आणि नखे विकली. उत्तर भारतात वाघांच्या अवयवाचे ग्राहक मोठय़ा प्रमाणावर असल्याने या टोळीचा त्यांच्याशी नेहमी संपर्क असतो. कटनी गँग आणि बहेलिया शिकारी यांच्या कामाचे स्वरुप वेगळे नाही.

पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातही विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करण्याचा प्रस्ताव कार्यकारी वन्यजीव संरक्षक व अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही.के. सिन्हा यांनी मांडला आहे. वाघांच्या शिकारीच्या वाढत्या घटना पाहता मेळघाटातही एसटीपीएफ तैनात करण्याची गरज भासू लागल्याचे मत सिन्हा यांनी नोंदविले आहे. एसटीपीएफ ही योजना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या १०० टक्के निधीतून राबविली जाते. दरम्यान सध्यातरी मेळघाटात एसटीपीएफ तैनात करण्याची योजना दृष्टिपथात नाही, असे सूत्रांनी सांगितले.