चार वर्षांतील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्य़ांचा पट
इमू व ससे पालनातील गुंतवणुकीतून १५० ते २०० टक्के परतावा.. स्थावर मालमत्ता व शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे घसघशीत नफा.. २४ महिन्यांत दामदुप्पट योजना.. सोन्यातील गुंतवणुकीद्वारे लखलखीत नफा.. वृक्षलागवड गुंतवणुकीत भरघोस उत्पन्नाची हमी.. आणि हे कमी म्हणून की काय, ‘केबीसी’मध्ये तीन वर्षांत तिप्पट रकमेसह मूळ गुंतवणूक परत देण्याचे दाखविलेले आमिष.. मागील चार वर्षांत अशा भूलथापांना वारंवार बळी पडून सर्वसामान्य मध्यमवर्गीय, गृहिणी, शेतकरी, कामगार असा भलामोठा वर्ग कोटय़वधी रुपयांना नाडला गेला आहे. परंतु इतके सारे घडूनही अशी नवी योजना आली रे आली, की कोणतीही शहानिशा न करता परत नव्याने गुंतवणूक करण्यास नागरिक पुढे येत असल्याचे निराशाजनक चित्र आहे. कमी कालावधीत घसघशीत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने काहींना आपले प्राण, तर कित्येकांना आयुष्यभराची पुंजी गमवावी लागली आहे. तथापि नागरिकांच्या मानसिकतेत मात्र बदल होत नसल्याचे तपास यंत्रणेचे निरीक्षण आहे. केबीसी क्लब अ‍ॅण्ड रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाऊसाहेब छबू चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण, आरती छबू चव्हाण यांनी शेकडो नागरिकांना कोटय़वधींना चुना लावल्याचे उघड झाल्यानंतर सर्वसामान्यांना किती सहजपणे वारंवार फसविले जाऊ शकते हे प्रकषाने दाखवून दिले. या स्वरूपाच्या योजनांमध्ये आधीच हजारो नागरिकांचे हात पोळले गेले, तरीदेखील ‘केबीसी’ने दाखविलेली मूळ गुंतवणूक सहा महिन्यांनी पैसे परत देऊन, तीन वर्षांत तीनपट रक्कम देण्याच्या आमिषाला शेकडो नागरिक बळी पडले. या योजनेत मोठी संख्या ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांची आहे. म्हणजे, आधी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या या कंपन्यांनी आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केल्याचे लक्षात येते. मागील चार वर्षांत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत या स्वरूपाचे फसवणुकीचे एकूण १३ गुन्हे दाखल झाले. त्यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील काही प्रकरणे अधिक तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविली गेली. काही प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, तर काही प्रकरणे तपास प्रक्रियेत आहेत. त्यातील अटक झालेले बहुतेक संशयित न्यायालयातून जामिनावर सुटले आहेत. या प्रकरणांमध्ये काही नागरिक तक्रारींसाठी पुढे आले असले, तरी कित्येकांनी तक्रार देण्याचेही टाळल्याचे सांगितले जाते.

पक्षीपालनाच्या गुंतवणुकीवर २०० टक्के परतावा देण्याचे आमिष. ११ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी. गुन्हा दाखल झालेले संशयित हरीश दीक्षित, संतोष शिंदे, सुमित ठरानी, अविनाश देशमुख, नितीन आव्हाड, संतोष शिंदे, प्रवीण सांगळे, अविनाश सोनवणे, अमोल सोनवणे, संदीप करंजकर, नीलेश कुटे, विष्णू लोया, राकेश मगर, सूरज विसपुते. (या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.)

गुंतवणुकीवर २०० ते ३०० टक्के नफ्याचे आमिष. १५ कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी. केरळमध्ये कंपनीच्या संचालकांविरुद्ध ५१ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झालेले संशयित कमल कनान, सदाशिवम पी., भूपती मनोहरन, किरू बहाल रामस्वामी, प्रीतीश ऊर्फ आनंद नागराजन, श्रीराम राजेश मोरे. अटकेनंतर संशयितांची जामिनावर सुटका. (या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.)

* इमूपालन योजना
इमूपालनाद्वारे भरघोस नफा देण्याचे आमिष. २० कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याच्या तक्रारी. गुन्हा दाखल झालेले संशयित हरीश दीक्षित, विश्वजीत सूर्यवंशी, कुमार सूर्यवंशी, संतोष मैंद, दीपक पवार, गंगाधर जानराव. ( या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.)

शेअर बाजार व स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीद्वारे लक्षणीय नफ्याचे आमिष. अडीच लाखाची फसवणूक झाल्याच्या तक्रारी. गुन्हा दाखल झालेले संशयित राजेश पळसकर, जितेश एम. श्रीवास्तव, रश्मी कुलकर्णी, नाजरीन अय्युम पठाण, रुपेंद्र पठाण, सपना.  या प्रकरणात केवळ एकाला अटक. मुख्य संशयित पळसकर अद्याप फरारी आहे, तर ऊर्वरित चार जणांचा तपासात ठावठिकाणा लागू शकला नाही.
* गणराज सेल्स प्रा. लिमिटेड
२४ महिन्यांत रक्कम दामदुप्पट करण्याचे प्रलोभन. अंदाजे १२ ते १३ कोटी रुपयांची फसवणूक. गुन्हा दाखल झालेले संशयित श्रीकांत गोंधळकर, पल्लवी गोंधळकर, सचिन गोंधळकर, मनोज ठोसर व स्वप्नाली ठोसर. त्यातील श्रीकांत व पल्लवी गोंधळकर यांनी प्रथम अटकपूर्व जामीन मिळविला. नंतर त्यांच्यासह इतर संशयितांनाही अटक करण्यात आली. सध्या जामिनावर मुक्त. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
* गोल्डसुख योजना
सोन्यातील गुंतवणुकीद्वारे जादा रक्कम देण्याचे प्रलोभन. १४ लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी. गुन्हा दाखल झालेले संशयित नरेंद्रदास शेखावत, महेंद्र निरवाणा, प्रमोद शर्मा, महेंद्र प्रताप सिंग, आशा शर्मा, जग्गू शर्मा, रामेश्वर शर्मा, अमोल गोव्हे. या प्रकरणातील प्रमुख संशयित राजस्थान येथील आहेत. अटक होऊन संशयितांची जामिनावर सुटका.
* विकल्प (दोन गुन्हे)
कमी काळात तिप्पट रक्कम देण्याचे आमिष. दोन्ही गुन्’ाांतील मिळून सुमारे साडेसात कोटीहून अधिकची फसवणूक. याप्रकरणात माजी पोलिसांचा सहभाग. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची फसवणूक. गुन्हा दाखल झालेले संशयित मयांक ध्रुव, संजय भालेराव, विजय निकम, संतोष आहेर, योगेश खैरनार, मनीषा झाल्टे. अटक होऊन संशयितांची जामिनावर सुटका. संशयितांची मालमत्ता सील करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
* रॅबिट इंट्राबिट कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर व मोर ग्रुप (दोन गुन्हे)
एका गुन्ह्य़ात ससापालन, तर दुसऱ्या गुन्’ाात रिटेल चेन मार्केटिंगचे प्रलोभन. पहिल्या गुन्ह्य़ात अंदाजे १८ कोटींहून अधिक, तर दुसऱ्या गुन्ह्य़ात सुमारे साडेसात कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारी. गुन्हा दाखल झालेले संशयित अश्विन मोरे, चंद्रशेखर मोरे, शिवांगी मोरे, रेवती गिते, विकास भदाणे, अजय चौधरी, महारू शंकर निकम, युवराज पाटील. काहींना अटक, काही संशयितांनी अटकपूर्व
जामीन मिळविला.
* समृद्धी वेल्थ योजना
हप्त्याने गुंतवणुकीच्या योजनेद्वारे झटपट उत्कर्ष साधण्याचे प्रलोभन. २० कोटींहून अधिकच्या फसवणुकीचा अंदाज. गुन्हा दाखल झालेले संशयित अजय क्षत्रिय, नमिता क्षत्रिय, नरेंद्र जोशी. अटक होऊन संशयितांची जामिनावर सुटका. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.
* केबीसी प्राइड फंड
भरघोस परताव्याचे प्रलोभन. तक्रारदार नसल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. कोटय़वधीच्या फसवणुकीचा संशय. केबीसीच्या कार्यालयातून चार कोटी ६१ लाखांची रोकड जप्त. गुन्हा दाखल झालेले संशयित भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, आरती चव्हाण व इतर. अटकेनंतर संशयितांची जामिनावर सुटका.
* केबीसी क्लब अ‍ॅण्ड रिसॉर्ट प्रा. लिमिटेड
गुंतवणुकीवर तीन वर्षांत मूळ रकमेसह तिप्पट रक्कम देण्याचे आमिष. आतापर्यंत सुमारे ३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या
 तक्रारी. गुन्हा दाखल झालेले संशयित कंपनीचे संचालक
भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, बापूसाहेब चव्हाण यांच्यासह कर्मचारी व दलाल. सहा संशयितांना अटक, मात्र मुख्य संशयित फरारी. तक्रारींचा ओघ सुरूच. या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग.