जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात व्याज दर लावलेली पाण्याची देयके आल्यानंतर काही नगरसेवकांनी पाणी देयक कर विभागातील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे व्याज दर आकारणे चुकीचे असल्याचे सांगितले होते. न दिलेल्या पाणी देयकावरील व्याज दर प्रशासनाच्या अंगाशी येईल म्हणून काही नगरसेवकांनी पत्रे देऊन ही चुकीची देयके मागे घेण्याची मागणी केली होती. पण हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही काही करू शकत नाही असे सांगून कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांची पत्रे कचरापेटीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे.
काळा तलाव भागात मोठय़ा प्रमाणात चाळी आहेत. या भागातील रहिवाशांना दोन टक्के व्याज दर लावलेली पाणी देयके आल्यानंतर त्यांनी नगरसेविका समिधा बासरे व माजी नगरसेवक सचिन बासरे यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांना निवडणुकीचे कारण देत फेब्रुवारी व मार्च महिन्याची पाणी देयके देण्यात आली नाहीत. मग त्यावर थकीत रक्कम म्हणून व्याज कसले आकारता असा प्रश्न बासरे दाम्पत्याने पाणी कर विभागातील कर्मचाऱ्यांना विचारला. या वेळी संगणकात तयार केलेल्या देयकात बदल करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे नागरिकांना तयार देयक भरणा करावे लागेल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नगरसेवक वामन म्हात्रे यांनीही प्रशासनाला चक्रवाढ व्याज पद्धतीने लावलेली दोन टक्के म्हणजे २४ टक्के लावलेले व्याज नियमबाह्य़ आहे. ४० ते ५० हजार नागरिक फुकट चोरून पाणी पीत आहेत. त्यांना पालिका कोणतेही पाणी देयक पाठवत नाही. मग प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या खिशावर प्रशासन डल्ला का मारीत आहे, असा प्रश्न करून लावलेले व्याज रद्द करण्याची मागणी केली होती. महापौर कल्याणी पाटील या फक्त महापौर पदाचे उर्वरित दीड वर्ष कसे लोटायचे या विवंचनेतून पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या संपर्कात असल्याने त्यांना नागरिकांना काय त्रास होतो, शहरातील विकास कामांचा उडालेला बोजवारा या विषयी काही देणे-घेणे नसल्याचे टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.