कल्याण-डोंबिवली महापालिकेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या कल्याणमधील सहजानंद चौक ते दुर्गाडीपर्यंतच्या रस्त्यावर ३६ लाख ४९ हजार रुपये खर्च करून नवे पथदिवे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
या रस्त्यावरील जुन्या दिव्यांचे आयुष्यमान संपले असल्यामुळे तेथे नवीन दिवे बसवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत आणला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यास मनसे, काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी विरोध केला. महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाला सहा वर्षांपूर्वी पत्रीपूल व्हाया गोविंदवाडीमार्गे दुर्गाडी पूल हा एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी देण्यात आला आहे. या रस्त्यामुळे कल्याण शहरातून शिवाजी चौकमार्गे होणारी अवजड वाहतूक शहराबाहेरून वळवता येणार आहे. या रस्त्याचे काम अतिशय कूर्मगतीने सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मागील सहा वर्षांत रस्त्याचे काम अतिशय रडतखडत पद्धतीने सुरू आहे. अशा रस्त्यांवर महापालिकेने कशासाठी दिवे लावायचे असा प्रश्न मनसे, काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. राज्य रस्ते विकास महामंडळ रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर तेथे टोल आकारते. तसेच दिवाबत्तीची कामेही संबंधित विभागामार्फत केली जातात. असे असताना या मार्गावर दिवाबत्ती उभारण्याची घाई महापालिकेने कशासाठी केली, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावात या रस्त्यावर दिवे लावण्याचा विषय नाही. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर दिवे लावण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले.