६ बस निकामी * चालक आजारी
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील खड्डय़ांमधील दगड केवळ नागरिकांचा बळी घेत नाहीत, तर यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ३५ बसगाडय़ांचे टायर पंक्चर केले आहेत. सहा बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. अगोदरच भंगार अवस्थेत असलेल्या ‘केडीएमटी’च्या बसेस खड्डे आणि त्यामधील दगडांमध्ये आपटून खिळखिळ्या होत आहेत. खड्डय़ांमुळे बसेस खिळखिळ्या होत असल्याच्या तक्रारी केडीएमटीतील काही वाहक, चालकांनी व्यवस्थापनाकडे केल्या आहेत.
कल्याणमधील गणेशघाट आगारातील ३५ बसेसचे टायर खड्डय़ांमुळे पंक्चर झाल्याच्या तक्रारी चालकांनी केल्या आहेत. कमी मुनष्यबळ तसेच अपुऱ्या साधनांमुळे परिवहन उपक्रमातील अनेक बसगाडय़ा दुरुस्तीअभावी आगारात उभ्या आहेत. बसेसचे टायर वारंवार पंक्चर होत असल्यामुळे कार्यशाळेतील कर्मचारी एवढय़ा बसगाडय़ा कधी दुरुस्त करायच्या या विवंचनेत आहेत. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक बसेसचा प्रत्येक भाग खिळखिळा झाला आहे. आता खड्डय़ांमध्ये खडी, दगडगोटे टाकण्यात आल्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या खड्डय़ांमुळे अनेक चालकांना मान, पाठ दुखणीचा आजार सुरू झाला आहे. परिवहन उपक्रमाच्या एकूण ६० ते ६५ बस दररोज प्रवासी वाहतुकीसाठी धावत असतात. त्यामधील ४० बसदुरुस्तीसाठी बंद असल्याने प्रवासी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या फक्त ३० बस विविध मार्गावर धावत आहेत. शहरातील बसचे काही मार्ग बंद करून उत्पन्न देणाऱ्या मार्गावर काही बस सोडण्यात येत आहेत. बस लवकर दुरुस्त होत नसल्याने परिवहन उपक्रमातील अनेक चालक खासगी वाहने, अन्य उपक्रमांमध्ये डबल डय़ुटी करीत आहेत.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था आणखी बिकट आहे. या वेळी परिवहन उपक्रमात पगार देण्यासाठी पैसे नसल्याने ओव्हर ड्राफ्ट घेण्याची वेळ परिवहन प्रशासनावर आली आहे. प्रशासनाकडून उपक्रमाला दरवर्षी ५० लाखाचा निधी मिळायचा तोही बंद झाला आहे. बसेस नादुरुस्त होत असल्यामुळे उपक्रमाचे उत्पन्न घटत चालले आहे.