डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे जमा-खर्चाचे गणित जमविताना नाकीनऊ आलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने (केडीएमटी) आपल्या तिकीट दरांमध्ये एक रुपयांची वाढ करण्याचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. १० किलोमीटर ते ५० किलोमीटर या टप्प्यांतील प्रवासासाठी १ रुपया ते ३ रुपयांपर्यंत भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. केडीएमटीच्या प्रवाशी सेवेच्या दर्जाविषयी प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर असताना हा भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने या प्रस्तावास मान्यता द्यावी किंवा नाही याविषयी नगरसेवकही संभ्रमात असल्याचे वृत्त आहे.
परिवहन उपक्रमाच्या नव्या प्रस्तावानुसार, वातानुकूलित बस सेवेचे तिकीट दर १ किमीपासून ते ५० किमीपर्यंत अनुक्रमे १५ रुपये ते ११० रुपये असणार आहेत. मागील वर्षी परिवहन उपक्रमाने एक रुपयांची तिकीट दरवाढ केल्याने उपक्रमाचे १ किमी ते ९ किमी अंतराचे प्रवासी घटले होते. हे प्रवासी परत मिळविण्यासाठी उपक्रमाने पहिल्या ९ किलोमीटरच्या प्रवासासाठी कोणतीही तिकीट दरवाढ केलेली नाही.प्रस्तावित ८ टक्के भाडेवाढ लागू केल्यास तिकीट दरातून उपक्रमाला दररोज ५० हजार रुपये महसूल मिळेल. प्रवासी तिकीट दरातून परिवहन प्रशासनाला वार्षिक १ कोटी ८२ लाखांचा महसूल मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. येत्या काळात उपक्रमात ४० नवीन वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील वातानुकूलित बसच्या भाडय़ातील सुसूत्रता विचारात घेऊन कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने या बसचे भाडे निश्चित केले आहे. मागील पंधरा वर्षांत प्रशासनाने सात वेळा तिकीट दरवाढ केली आहे. डिझेल, आस्थापना, बसचे सुटे भाग आदींवर होणारा वाढता खर्च पाहता भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, असा दावा उपक्रमाने केला आहे.