पनवेलमध्ये मतांची खरेदी-विक्री होत असली तरीही सर्वच मतदार या व्यवहारामध्ये सामील नाहीत. प्रत्येक राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारादरम्यान घरोघरी किंवा गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये जाऊन मतदारराजाला भेट देत आहेत. मात्र ज्या तडफेने उमेदवार आज घरी येत आहेत त्याच तडफेने साहेब तुम्ही निवडून आल्यावर आमची कामे करा, अशी मनोभावे मागणी मतदारराजा या उमेदवारांकडे करत आहे. बुधवारी मतपेटीमध्ये मतदान झाल्यानंतर उमेदवारांसहीत पनवेलकरांचे भवितव्य पाच वर्षांसाठी विजयी उमेदवारांच्या हाती जाणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पनवेलच्या समस्या सोडवू असा दावा अनेक राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान केला. मात्र किती काळात सोडवू किंवा कामे करण्यात अपयशी ठरल्यास त्यापुढे काय, याविषयीची कोणतीही बांधीलकीचे पत्र या प्रचारात प्रसिद्ध केलेले नाही. निवडून आल्यावर या समस्यांचा निपटारा करावा, अशी आशा मतदारांनी व्यक्त केली आहे.

* पनवेलचे रखडलेले सरकारी  रुग्णालय, त्यामध्ये ट्रामा सेंटर सुरू करावे, अत्याधुनिक चालणारी यंत्रणा येथे असावी, डाँक्टर, परिचारिकांच्या जागा भराव्यात.
* पनवेल शहर फेरीवालामुक्त करावे, पदपथांचा ताबा पुन्हा एकदा नागरिकांना मिळावा, फेरीवाला धोरणासाठी फूडमॉल उभारावे.
* पनवेलच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, गाडेश्वर धरणाचा गाळ काढावा, जुने मोरबे यांसारखे नवीन जलस्रोत शोधून पनवेलकरांसाठी हक्काची धरणे बांधावीत, शहरातील पिण्याच्या पाण्याची जुनाट जलवाहिनी बदलावी.
* पनवेलची हक्काची परिवहन सेवा उभारावी,     शक्य नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात एनएमएमटी किंवा बीएसटीच्या सहकार्यातून रेल्वे स्थानक ते सिडको वसाहती जोडणारी बससेवा सुरू करावी.
रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्यासाठी भाग पाडावे.
पनवेलच्या ग्रामीण परिसरातील भारनियमन बंद करावे. पनवेलच्या वाढत्या शहरीकरणाचा अंदाज घेऊन महावितरण कंपनीच्या नवीन उपकेंद्रांची तालुक्यात रखडलेली कामे मार्गी लावावीत.