पीएमपी प्रशासनातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवासी दिनाचा उपक्रम राबविला जात असला, तरी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमपीने सकारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे पत्र पीएमपी प्रवासी मंचतर्फे प्रशासनाला देण्यात आले आहे.
प्रवासी दिनाचा उपक्रम सप्टेंबरपासून अवलंबला जात आहे. या उपक्रमात पीएमपीच्या दहा आगारांमध्ये प्रवाशांच्या तक्रारी, सूचना स्वीकारल्या जातात. प्रत्यक्षात आगार प्रशासन या उपक्रमाबाबत उदासीन असल्यामुळे एक चांगला उपक्रम निष्प्रभ ठरण्याची भीती आहे, अशी तक्रार संघटनेचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेने काही उपाययोजनाही सुचवल्या असून त्यांची अंमलबजावणी प्रशासनाने सर्व आगारांमध्ये करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमाची माहिती चार दिवस अगोदर वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करावी, आगाराच्या प्रवेशद्वारातही या उपक्रमाचे फलक लावावेत, सर्व बस स्थानके, पास केंद्र, प्रमुख थांबे येथेही फलक लावावेत, सर्व गाडय़ांमध्येही या उपक्रमाची माहिती देणारे कायमस्वरूपी फलक लावावेत अशा सूचना करण्यात आल्या
आहेत.
त्याबरोबरच सहभागी प्रवाशांच्या सूचना, तक्रारी यांची नोंद लेखी स्वरूपात ठेवावी, या नोंदींचा अहवाल आगार प्रमुखांनी प्रवासी दिनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यालयाला पाठवावा, निर्धारित वेळेत कार्यवाही पूर्ण करून त्याची माहिती तक्रारदाराला कळवावी, तसेच कार्यवाही पूर्ण झाल्याचा आढावा सहव्यवस्थापकीय संचालकांनाही द्यावा अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
ज्या तक्रारी सोडविण्यात आल्या त्यांची माहिती प्रशासनाने नियमित प्रसिद्ध करावी तसेच सेवा सुधारण्यासंबंधी सूचना करणाऱ्या प्रवाशांना, नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, या उपक्रमाची सकारात्मक दृष्टीने दखल घ्यावी म्हणजे त्यातून पीएमपी सेवा सुधारेल असेही प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे.    

पीएमपीतर्फे आज प्रवासी दिन
पीएमपीतर्फे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रवासी दिनाचे आयोजन केले जाते. शनिवारी (१ डिसेंबर) हा उपक्रम होत असून पीएमपीच्या सर्व दहा आगारांमध्ये हा उपक्रम केला जाईल. प्रवाशांना/नागरिकांना जवळच्या आगारात जाऊन पीएमपी सेवेसंबंधी तक्रारी वा सूचना देता येतील.