रेल्वे स्थानकांची स्वच्छता ही रेल्वेची जबाबदारी असली, तरी त्यात प्रवाशांनीही आपला वाटा उचलायला हवा, असे आवाहन सातत्याने करणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. याआधी दोन शैक्षणिक संस्थांनी पश्चिम रेल्वेवरील दोन स्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता वडाळा स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी ‘विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट’ या संस्थेने उचलली आहे. हार्बर मार्गावरील या महत्त्वाच्या स्थानकाची स्वच्छता करण्यासाठी या संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी रेल्वे प्रशासनाला मदत करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मोहिमे’चा भाग म्हणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेतही स्वच्छतेची कास धरली. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत विविध संस्थांशी करारमदारही केले आहेत. याच योजनेचा भाग म्हणून रेल्वेमंत्री प्रभू यांनी विविध संस्थांना स्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते. मुंबईतील उपनगरीय स्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था पुढे आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याआधी मिठीबाई महाविद्यालयाने विलेपाल्रे स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर चर्नीरोड स्थानकासाठी या स्थानकाजवळील विल्सन महाविद्यालयाचे विद्यार्थी पुढे सरसावले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील या दोन स्थानकांनंतर आता हार्बर मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या अशा वडाळा रोड स्थानकाच्या स्वच्छतेचा वसा ‘विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट’ या संस्थेने घेतला आहे. शनिवारी या संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह वडाळा रोड येथे स्वच्छता आणि सुशोभीकरणाची अनेक कामे हाती घेतली. यात स्थानकावर उत्तम चित्रे रंगवणे, पिण्याच्या पाण्याची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी करणे, स्थानक परिसरात झाडे लावून हिरवळ तयार करणे, कचरापेटय़ा ठेवणे, स्थानक स्वच्छ करणे आदी अनेक कामांचा समावेश होता.
‘अशा प्रकारची स्वच्छता मोहीम स्वत: हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व तर पटेलच, पण त्याचबरोबर आपला परिसर घाण होऊ नये, यासाठी ते इतरांनाही समजावतील. तसेच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी व कर्मचारी असलेल्या आमच्या संस्थेने वडाळा स्थानकासारखे महत्त्वाचे स्थानक स्वच्छता व सुशोभीकरणासाठी ताब्यात घेतल्याने प्रवाशांनाही चांगलाच फायदा होईल,’ असे या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संजीवनी देशपांडे यांनी स्पष्ट केले.
या संस्थेप्रमाणे मुंबईतील इतर संस्थांनी पुढे येऊन स्थानक स्वच्छतेसाठी रेल्वेशी सहकार्य केल्यास मुंबईतील सर्वच स्थानके स्वच्छ व नीटनेटकी राहण्यास मदत होईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे स्वच्छ भारत व स्वच्छ रेल्वेचे स्वप्नही साकार होईल, असे मत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी व्यक्त केले.